
Rajya Sabha Election 2026 : देशभरातील राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकालही जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने विशेष लक्ष लागले आहे.
राज्यसभेतील शरद पवार, फौजिया खान, रजनी पाटील, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी आणि भागवत कराड यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे या जागांसाठी नव्या उमेदवारांची निवड होणार आहे.
महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी असल्याची माहिती समोर येत आहे. मविआकडे सुमारे 46 आमदारांचे संख्याबळ असून एका उमेदवारासाठी 41.5 चा कोटा आवश्यक आहे. त्यामुळे मविआकडून एक जागा निश्चित मानली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीकडे पुरेसे संख्याबळ असल्याने त्यांचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. पार्थ पवार राज्यसभेवर गेल्यास आजोबा-नातू असे दोघे एकाचवेळी राज्यसभेत असण्याची राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घटना ठरू शकते.राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अंतिम निर्णय कोअर कमिटी घेईल असे स्पष्ट केले आहे.
भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यसभेची निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचे संकेत दिले आहेत. सध्याच्या विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीला 6 जागांपर्यंत संधी मिळू शकते. मात्र या 6 जागांचे वाटप भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने अतिरिक्त उमेदवार न दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.