
मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यभरात पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे. हवामान विभागाकडून (IMD) पुढील काही दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. याशिवाय नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. खासकरुन मुंबई, ठाणे, रायगड, पालघर अशा जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे. शहरातील अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सखल भागात पाणी साचल्याची स्थितीही निर्माण झाली आहे. यामुळे महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि अन्य यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी समुद्रकिनारे, सखल भाग आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रेड अलर्ट लक्षात घेता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि पालघर येथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्या-नाल्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.
विदर्भातील गोंदिया, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जुलैच्या सुरुवातीलाच झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.