जरांगे उपोषणाला बसतील त्या दिवशीच नांदेड ते मुंबई लॉंग मार्च काढेन, लक्ष्मण हाकेंचा इशारा

Published : May 29, 2025, 01:54 PM ISTUpdated : May 29, 2025, 01:55 PM IST
Laxman Hake

सार

ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना इशारा दिलाय. हाके यांनी म्हटले की, जरांगे उपोषणाला बसल्यास त्याच दिवशी मुंबई ते नांदेश पायी लाँग मार्च काढेन.

Laxman Hake : ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे. जर जरांगे मुंबईत उपोषणाला बसले, तर त्याच दिवशी नांदेड ते मुंबई असा पायी लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची घोषणा हाके यांनी केली आहे.

ओबीसींची ताकद दाखवण्याचा निर्धार

लक्ष्मण हाके सध्या राज्यभर दौरे करत असून ओबीसी समाजाला एकत्र करत आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "ज्यांनी तुम्हाला आमदार, खासदार आणि मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवलं, त्या ओबीसी समाजाचेच तुम्ही चोपडे उध्वस्त करायला निघालात, तर त्याच समाजात तुम्हाला जागा दाखवण्याची ताकद आहे."

सांगोल्यात भव्य स्वागत, जुनोनी गौडवाडीतून घोषणा

आज सांगोला तालुक्यातील जुनोनी गौडवाडी गावात झालेल्या दौऱ्यात त्यांनी मोठी घोषणा केली. "मनोज जरांगे नावाचा माणूस ज्या दिवशी मुंबईत उपोषणाला बसेल, त्याच दिवशी नांदेड जिल्ह्यातील माळेवाडी येथे नारळ फोडून आम्ही आमच्या नांदेड ते मुंबई लॉंग मार्चला सुरुवात करू," असे हाके यांनी सांगितले.

‘बोगस कुणबी दाखले घेतलेल्या ओबीसींना खड्यासारखे बाजूला करा’

हाके यांनी पंचायत राज निवडणुकांमध्ये ‘फक्त खऱ्या ओबीसीला मतदान करा’ अशी टॅगलाईन दिली असून, बोगस कुणबी दाखले घेतलेल्या ओबीसींना खड्यासारखे बाजूला करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी राज्यभर १०० सभा घेतल्या जाणार असून, अत्यंत मायक्रो प्लॅनिंगद्वारे ओबीसी समाजाची एकजूट साधण्याचा दावा त्यांनी केला आहे.

भुजबळांचा विरोध करणाऱ्यांनाही इशारा

हाके यांनी स्पष्ट केलं की, जे ओबीसींच्या अस्तित्वाला धक्का देतात, त्यांना हा इशारा आहे. मुख्यमंत्री, मनोज जरांगे आणि ज्यांनी छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाला विरोध केला त्या सगळ्यांना आता ओबीसी समाज आपली ताकद दाखवून देणार आहे.

राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं

या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात नव्या संघर्षाची चिन्हं दिसू लागली आहेत. ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हा लॉंग मार्च आणि आंदोलन कोणत्या दिशा घेणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Satbara Utara : सातबारा उताऱ्यात या नोंदी दिसल्या तर सावध! जमीन जप्तीपासून कारवाईपर्यंत मोठे परिणाम, जाणून घ्या संपूर्ण माहिती
जमीन वापर नियमांत ऐतिहासिक बदल! ‘सनद’ची अनिवार्यता रद्द; नागरिक–बिल्डर्स–जमीनधारकांना मोठा दिलासा