
पानशेत, पुणे: “पर्यटन आणि चित्रपटसृष्टी यांचा समन्वय झाला, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि नैसर्गिक संपत्तीचा जागतिक स्तरावर प्रभावी प्रचार होऊ शकतो,” असा ठाम विश्वास चौथ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात उपस्थित तज्ज्ञांनी व्यक्त केला. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने परभन्ना फाउंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ आणि धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पानशेत धरण परिसरातील सूर्यशिबीर रिसॉर्ट येथे दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या महोत्सवात लघुपट, माहितीपटांचे स्क्रीनिंग, पर्यटनविषयक चर्चासत्रे, जंगल सफारी, सांगीतिक कार्यक्रम, शिवकालीन शस्त्रप्रदर्शन, मर्दानी खेळांचे सादरीकरण, अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
‘मोलाई: मॅन बिहाइंड द फॉरेस्ट’ (धीरज कश्यप) — माहितीपट विभागात प्रथम क्रमांक
‘शरावथी सांगथ्या’ (याजी) — लघुपट विभागात प्रथम क्रमांक
‘गुडवी: मायग्रेटरी बर्ड्स नेस्ट’ – माहितीपट विभागात द्वितीय क्रमांक
‘मिनी बँक’ – लघुपट विभागात द्वितीय क्रमांक
‘दशावतारी ऑफ कोकण’ – विशेष पारितोषिक
‘डिव्हाईन कलर्स ऑफ फेथ’ व ‘झालना’ – स्पेशल ज्युरी अवॉर्ड
महोत्सवाच्या चर्चासत्रांमध्ये अनेक तज्ज्ञ, कलावंत आणि उद्योग क्षेत्रातील मंडळींनी पर्यटन आणि चित्रपट क्षेत्रातील संधी, अडथळे आणि उपाय योजनांवर मते मांडली.
'महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे आणि चित्रपटांचे चित्रीकरण' या विषयावर सुमित पाटील, अमेय भाटे, निलेश धामिस्ते, हेमंत वाव्हळे, हनुमंत चोंधे यांनी सखोल विचार मांडले.
‘पानशेतमधील निसर्ग, इतिहास व रोजगाराच्या संधी’ या विषयावर श्रमिक गोजमगुंडे व महेश धिंडले यांची प्रकट मुलाखत झाली.
स्थानिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स, रिसॉर्ट व्यावसायिक, आणि पर्यटनप्रेमींना एकत्र आणणाऱ्या संवादातून नव्या संधींचा मार्ग खुला झाला.
जीवनगौरव पुरस्कार – वीणा गोखले (गिरीसागर टूर्स)
सर्वोत्कृष्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुरस्कार – अमित कुलकर्णी (गेट सेट गो हॉलिडेज)
पुण्यातील अनेक टूर्स अँड ट्रॅव्हल्स पदाधिकाऱ्यांचा सन्मान
निबंध स्पर्धा, प्रवासवर्णन स्पर्धा, यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. ३० पेक्षा अधिक निबंध आणि १८ पेक्षा अधिक प्रवासवर्णनं आली, ही बाब भावी पिढीत पर्यटनाबद्दल जागरूकता निर्माण करणारी ठरली.
महोत्सवाचे उद्घाटन आमदार शंकर मांडेकर, अभिनेत्री स्मिता तांबे, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, माजी सनदी अधिकारी अर्जुन म्हसे पाटील, संयोजक गणेश चप्पलवार यांच्या उपस्थितीत झाले. आरजे तेजू यांनी सूत्रसंचालन केले, तर असीम त्रिभुवन यांनी आभार प्रदर्शन केले. डॉ. राजीव घोडे, अश्विनी वाघ, महेश गोरे, अजित शांताराम, साहिल भोसले, सारंग मोकाटे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात परिश्रम घेतले.
“महोत्सवात सादर झालेल्या लघुपटांमुळे विविध पर्यटन स्थळांचे अनोखे पैलू प्रकाशझोतात आले. आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाद्वारे केवळ पर्यटनाचा प्रचारच होत नाही, तर स्थानिक कलाकार व चित्रपट निर्मात्यांनाही नवे व्यासपीठ मिळते. पर्यटनाला समर्पित हा महोत्सव पर्यटन व चित्रपट या दोन्ही क्षेत्रांची सांगड घालणारा आहे.”
– विठ्ठल काळे, अभिनेता
चित्रपट व पर्यटन क्षेत्रातील संवाद वाढवण्याची गरज अधोरेखित करत या महोत्सवाने महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाची, पर्यटन स्थळांची आणि स्थानिक सांस्कृतिक परंपरांची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी मांडणी करण्याची दिशा दाखवली आहे. असे उपक्रम केवळ पर्यटनाचे नवे दरवाजे उघडत नाहीत, तर सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचे आधारस्तंभ बनतात.