उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणेची माहिती दिली आहे. सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करणार असून, यासाठी सर्व अटी-शर्ती शिथिल केल्या जातील.
पुणे: राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या संकटाने शेतकरी हवालदिल झाले असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलासा देणारी घोषणा केली आहे. “ही वेळ राजकारणाची नाही, ही वेळ शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहण्याची आहे,” असं म्हणत त्यांनी सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करणार असल्याचं स्पष्ट केलं.
28
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी, नुकसान प्रचंड
शिंदे यांनी स्पष्ट केलं की, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि इतर अनेक भागांत मोठं नुकसान झालं आहे. "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि आम्ही सर्वांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहिली आहे. डोळ्यांनी पाहिलेलं हे नुकसान फार मोठं आहे. त्यामुळे यावेळी केवळ सहानुभूती नव्हे, तर ठोस निर्णय घेण्याची वेळ आहे," असं ते म्हणाले.
38
"शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची जबाबदारी सरकारची"
“बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आहेत. आपल्या मातांसारख्या महिला भगिनींच्या घरांवर संकट आहे. त्यांचे अश्रू पुसण्याचं काम सरकारचं आहे,” असे भावनिक शब्द वापरत शिंदेंनी सरकारच्या संवेदनशीलतेची जाणीव करून दिली.
शिंदे यांनी सांगितलं की, यावेळी कोणत्याही अटी-शर्ती आड येणार नाहीत. "शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक ते सर्व बदल आणि सवलती दिल्या जातील. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
58
केंद्राकडेही मदतीची मागणी, अमित शहा आणि मोदींना साद
गृहमंत्री अमित शहा यांना भेटून मदतीचं निवेदन देण्यात आलं असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंनी संयुक्तपणे हे पाऊल उचललं आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भेट घेऊन मदतीची मागणी केली आहे. "केंद्र सरकारने यापूर्वीदेखील संकटाच्या काळात हात दिला आहे, आणि यावेळीही नक्कीच मदत करेल," असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.
“शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत मिळाली पाहिजे, ही सरकारची ठाम भूमिका आहे. घरांचे नुकसान, जनावरांची हानी, पीक हानी, शेती वाहून जाणं, आणि जीवीत हानी यासाठी तात्काळ मदत सुरू करण्यात आली आहे,” असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
78
पीकविमा आणि नवे निकष, शेतकऱ्यांसाठी लाभदायक उपाय
शिंदे म्हणाले, “सरकारने पीकविम्यासाठीही नवे निकष ठरवले आहेत. ज्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल, तेच मार्ग स्वीकारले जातील. सरकार फक्त घोषणा करत नाही, तर त्या अंमलात आणण्याचा निर्धारही आमचा आहे.”
88
एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका आशादायक
राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी राज्य सरकार, विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका आशादायक आहे. दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचा निर्णय आणि केंद्राकडूनही सहकार्य मिळवण्याची तयारी ही बळीराजासाठी सुखद बातमी आहे.