"धनंजय मुंडेंकडून १८ तुकडे करण्याची धमकी" — करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप

Published : May 04, 2025, 05:01 PM IST
Dhananjay Munde

सार

सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर '१८ तुकडे करण्याची धमकी' दिल्याचा आरोप केला आहे. 

मुंबई | प्रतिनिधी राजकीय आणि वैयक्तिक वाद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून, त्यांच्याकडून "१८ तुकडे करण्याची धमकी" दिल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड गदारोळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शर्मा यांनी म्हटलं की, “कोर्टाने मला दोन लाख रुपये पोटगी मंजूर केली आहे. मात्र, अजूनही त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. उलटपक्षी, मला सतत धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या मुलीला उचलून नेण्याची, आणि मला बदनाम करून १८ तुकडे करण्याची धमकी धनंजय मुंडे यांनी स्वतः दिली.”

त्यांच्या म्हणण्यानुसार, या धमक्यांचे सर्व पुरावे त्यांच्या जवळ आहेत, त्यात व्हॉट्सअॅप चॅट्स, फोन कॉल्सचा उल्लेखही त्यांनी केला आहे. “ही प्रकरणं मी पोलिसांकडे दिली आहेत, पण अजूनही मला संरक्षण मिळालेलं नाही. पोलीस प्रशासन त्यांच्या दबावाखाली काम करतंय,” असा आरोपही त्यांनी केला.

लव जिहादपेक्षा अधिक अन्याय?

करुणा शर्मा यांनी एक खळबळजनक विधान करत म्हटलं, “लव जिहादपेक्षा अधिक अन्याय माझ्यावर झाला आहे. मी गेली तीन वर्षं विविध दरवाजे ठोठावत आहे, पण न्याय काही मिळत नाही. सरकार केवळ ‘लव जिहाद’ वर कायदे करते, पण हिंदू महिलांवर अन्याय करणाऱ्यांविरुद्ध काहीच कारवाई करत नाही.”

त्या पुढे म्हणाल्या, “माझी बदनामी करायची आहे? १८ तुकडे करायचे आहेत? तर स्पष्ट सांगा कुठे यायचंय, मी स्वतः येते. मी कुठल्याही बापाच्या मुलीला घाबरत नाही.”

मंत्रिमंडळ बैठकीत करणार हजेरी

करुणा शर्मा यांनी स्पष्ट इशारा दिला की त्या लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत हजेरी लावणार आहेत. “कोणत्याही नेत्याने मला आजवर न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. मी आता थेट मंत्रिमंडळात जाऊन प्रश्न विचारणार आहे,” असं म्हणत त्यांनी आपली भूमिका अधिक आक्रमक केल्याचे स्पष्ट केले.

PREV

Recommended Stories

प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!
भाविकांसाठी बंपर गिफ्ट! शिर्डी आणि तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी आता साप्ताहिक स्पेशल रेल्वे; लगेच पाहा संपूर्ण वेळापत्रक!