
नाशिक: नाशिकमध्ये एक संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. केवळ बहिणीला प्रपोज केल्याच्या संशयावरून तीन तरुणांनी एका १९ वर्षीय युवकाला भररस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नसीम शाह या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सातपूरमधील शिवाजीनगर परिसरात पाझर तलावाजवळ घडली.
मयत नसीम अकबर शहा (वय १९, रा. शिवाजीनगर) हा सायंकाळच्या सुमारास पाझर तलावाजवळून जात असताना विशाल तिवारी, आदित्य वाघमारे आणि वैभव भुसारे या तिघांनी दुचाकीवरून येत त्याला अडवले. नसीमला रस्त्यातच लाथाबुक्क्यांनी आणि हातातल्या वस्तूंनी अमानुष मारहाण करण्यात आली. त्यामुळे तो रस्त्यावर कोसळला.
एक जागरूक नागरिकाने ११२ क्रमांकावर कॉल करून नसीम जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला असल्याची माहिती पोलिसांना दिली. गंगापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नसीमला रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून केवळ ४–५ तासांत आरोपींचा माग काढला. गंगापूर पोलिसांच्या पथकाने सिन्नरफाटा, चांदोरी आणि सायखेडा परिसरातून तिघांनाही अटक केली.
गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल तिवारी याला नसीम शहा याने त्याच्या बहिणीला प्रपोज केल्याचा संशय होता. याच रागातून त्याने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने नसीमला रस्त्यात गाठून अमानुष मारहाण केली. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. ही घटना नाशिकसारख्या शांत शहरात खळबळजनक असून, केवळ संशयावरून जीव घेण्याच्या प्रवृत्तीवर समाजात चिंतन होणे आवश्यक आहे.