
BMC Election 2026 : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित यश मिळाले नसल्याने दोन्ही पक्षांसमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी २९ महानगरपालिका निवडणुका, विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणूक, ठाकरे बंधूंसाठी निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गटात सुरू असलेली जागावाटपाची चर्चा अद्याप अंतिम टप्प्यावर पोहोचलेली नाही.
नगरपरिषद निवडणुकांत अपयश, महापालिकांवर लक्ष
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांत दोन्ही पक्षांची कामगिरी निराशाजनक ठरली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकांमध्ये थेट प्रचारात फारसा सहभाग घेतला नाही, त्यामुळे संघटनात्मक ताकदही प्रभावीपणे दिसली नाही. मात्र, येत्या काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका या दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहेत. विशेषतः मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरे गट आणि मनसेसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.
मनसे–ठाकरे गट युतीची चर्चा, पण जागावाटप रखडले
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गटात युतीबाबत चर्चा सुरू आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असतानाही अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. दादर, शिवडी, माहीम, भांडूप आणि विक्रोळी यांसारख्या मराठीबहुल भागांमध्ये दोन्ही पक्ष अधिकाधिक जागा मिळवण्यावर ठाम असल्यामुळे रस्सीखेच वाढली आहे. परिणामी, उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत असून प्रचारासाठी कमी वेळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज ठाकरेंचा नेत्यांना इशारा, चर्चा लांबवू नका
प्रचारावर होणारा परिणाम ओळखून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वाला जागावाटपाची चर्चा फार लांबवू नका, असा स्पष्ट संदेश दिला आहे. मराठीबहुल प्रभागांवरून जास्त ताणतणाव निर्माण होऊ नये, असेही राज ठाकरे यांनी मनसेचे नेते तसेच संजय राऊत आणि अनिल परब यांना सूचित केले आहे. यानंतर दैनिक ‘सामना’च्या कार्यालयात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये संबंधित प्रभागांवर थेट चर्चा झाली असून, त्याची माहिती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे. आता या तिढ्यावर अंतिम निर्णय ठाकरे बंधू कधी आणि कसा घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपची तयारी जोमात, घरोघरी प्रचाराचा आदेश
दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने तयारीला वेग दिला आहे. उमेदवारी जाहीर होण्याची वाट न पाहता घरोघरी प्रचार सुरू करा, असा स्पष्ट आदेश भाजप नेतृत्वाने कार्यकर्त्यांना दिला आहे. मुंबई भाजपच्या निवडणूक संचालन समितीची नुकतीच बैठक पार पडली असून, प्रचार आणि सभांचे नियोजन पाहण्यासाठी तब्बल २७ समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे भाजप मैदानात आघाडी घेत असल्याचे चित्र आहे.