MSRTC Travel Pass Price : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) 'आवडेल तिथे प्रवास' योजनेच्या दरात मोठी कपात केली. नवीन दरानुसार पास २०० ते ८०० रुपयांनी स्वस्त झाले असून, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलतीही उपलब्ध आहेत.
मुंबई : फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) एक आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही कमी खर्चात प्रवास करता यावा, यासाठी सुरू करण्यात आलेली ‘आवडेल तिथे प्रवास’ योजना आता अधिक किफायतशीर करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत प्रवाशांना चार किंवा सात दिवस सलग एसटी बसमधून प्रवास करता येतो. विशेष म्हणजे अलीकडेच या पासच्या दरात मोठी कपात करण्यात आली असून, विविध प्रकारच्या बससाठीचे पास २०० ते ८०० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
26
मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत खास सवलती
५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना या पासवर ५० टक्के सवलत मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी ही योजना अधिक फायदेशीर ठरत आहे.
पूर्वी साध्या एसटी बससाठी चार दिवसांचा पास घेण्यासाठी प्रवाशांना १८१४ रुपये मोजावे लागत होते. आता तोच पास १३६४ रुपयांत उपलब्ध असून, तब्बल ४५० रुपयांची कपात करण्यात आली आहे.
तसेच १२ मीटर ई-बस ‘शिवाई’च्या पासचे दरही २६८१ रुपयांवरून २०७२ रुपये इतके कमी करण्यात आले आहेत. म्हणजेच जवळपास ७८९ रुपयांची बचत होणार आहे.
राज्यभर किंवा परराज्यात स्वस्त, सोयीस्कर आणि मुक्त प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल, तर ‘आवडेल तिथे प्रवास’ योजना नक्कीच प्रवाशांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.