मुंबईत BEST बसचा भीषण अपघात; ७ ठार, ४९ जखमी

मुंबईत कुर्ला येथे BEST बसचे नियंत्रण सुटल्याने अनेक वाहनांवर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण जखमी झाले आहेत. बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुंबई: मुंबईतील कुर्ला परिसरात झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातामुळे मुंबईकर हादरले आहेत. कुर्ला रेल्वे स्थानकातुन अंधेरीकडे जाणाऱ्या बेस्ट बसवरील  चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला तर ४९ जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

काय झालं?

कुर्ला पश्चिमेकडील बेस्ट बसस्थानकातून ३३२ क्रमांकाची बस अंधेरी स्थानकाकडे निघाली होती. एल वॉर्ड आणि बुद्ध कॉलनीच्या परिसरात भरधाव आलेल्या या बसवरचे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसचा वेग वाढून बसने रस्त्यावरील रिक्षांसह खासगी वाहने आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या धडकेत ७ जण ठार तर ४९ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

 घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बस ऑटोरिक्षा, मोटारसायकल आणि पादचाऱ्यांना धडकताना दिसत आहे. जखमींना मदत करण्यासाठी आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी लोक धावत होते. रस्त्यावर मृतदेह पडलेले दिसत होते. जखमींना तातडीने जवळच्या भाभा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातातील काही जखमींवर सायन रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तसेच काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलीसही जखमी

यासोबतच या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवानही जखमी झाले आहे. त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या या पोलिसांची प्रकृती स्थिर आहे..

 चालकाला अवजड वाहन चालवण्याचा अनुभव नाही

अपघाता वेळी सदर बसमधून तब्बल 60 प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं घडला. आरोपी बस चालक संजय मोरे एक डिसेंबर रोजी बेस्ट बस चालक म्हणून रुजू झाला. संजय मोरे कंत्राटी कामगार असून, त्याला अवजड वाहन चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. संजय मोरे यानं आतापर्यंत केवळ छोटी वाहनं चालवली आहेत. 

अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून बचावकार्य करण्यात आलं. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर घटनास्थळावर तत्काळ बचावकार्य सुरू केल्याची माहिती आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा सुरू होती. बस चालकानं मद्यपान केलं होतं, की नाही, याबाबत अद्याप काही स्पष्ट माहिती नाही.

आणखी वाचा-

गोरेगावात 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली ज्येष्ठ व्यक्तीची ७१ लाखांची फसवणूक

राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड

Share this article