मुंबई: विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची आज एकमताने निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणुन राहूल नार्वेकर यांची निवड करावी, यासाठी प्रस्ताव मांडला. यानंतर अनिल पाटील यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी रविवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, महाविकास आघाडीकडून कोणीही अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला नव्हता. त्यामुळे नार्वेकर बिनविरोध निवडूण येणार यावर शिक्कामोर्तब झाला होता. आज ९ डिसेंबर रोजी राहूल नार्वेकर यांच्या निवडीची औपचारीक घोषणा झाली आहे. दरम्यान, सोमवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे यात विधानसभा अध्यक्षांची एकमतानं निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. यानंतर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा केली. यानंतर राहुल नार्वेकर यांची बिनविरोध विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. राहुल नार्वेकर यांच्या निवडीनंतर आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
विधानसभेचे सर्व सदस्य आणि महाराष्ट्रातील तमाम १२ कोटी जनतेच्या वतीने राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्रात काही अपवाद वगळता सातत्याने विरोधीपक्ष नेत्याची निवड बिनविरोध करण्याची परंपरा विरोधीपक्षाने राखली आहे. याचा मान राखत आपल्या निवडीला पूर्ण समर्थन दिल्याबद्दल विरोधीपक्षाच्या सर्व सदस्य आणि गटनेत्यांचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राहुल नार्वेकर हे कुलाबा मतदारसंघाचे आमदार असून आता त्यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. ४७ वर्षीय राहुल नार्वेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती, पण २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष (NCP) मध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक लढवली. २०१९ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक जिंकून आमदार झाले. महाराष्ट्रातील मागील महायुती सरकारच्या काळात राहुल नार्वेकर हे देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष बनले. कुलाबा मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना ८१,०८५ मते मिळाली होती. त्यांचे कुटुंब राजकारणात सक्रिय आहे. त्यांचे सासरे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर असून वडील सुरेश नार्वेकर हे कुलाबा नगरपालिकेचे नगरसेवक राहिले आहेत. पेशाने वकील असलेल्या राहुल नार्वेकर यांनी बीकॉम आणि एलएलबीच्या पदव्या मिळवल्या आहेत.
आणखी वाचा-
मंत्रिमंडळ विस्ताराला होणार विलंब? नावांची निवड, चर्चा आणि दिल्लीची मंजुरी बाकी!