
Pune : पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. राजगड बालेकिल्ल्याच्या खडतर वाटेवरून सुमारे 400 फूट खोल दरीत पडून पुण्यातील 21 वर्षीय कोमल शिंदे यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (5 जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली असून, पर्यटनप्रेमी व ट्रेकर्समध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पर्यटक दाम्पत्य ट्रेकिंगसाठी आले आणि घडली दुर्घटना कोमल शिंदे (वय 21, रा. आळंदी, पुणे) या पतीसोबत राजगड ट्रेकसाठी आल्या होत्या. त्या दिवशी दुपारी झालेल्या पावसामुळे किल्ल्याच्या वाटा निसरड्या झाल्या होत्या. संध्याकाळी बालेकिल्ल्यावरून उतरतानाचा अंदाज असताना, त्या खडतर वाटेवरून अचानक सुमारे 400 फूट दरीत कोसळल्या. त्या थेट संजीवनी आणि सुवेळा माचीच्या दरम्यानच्या कठीण भागात पडल्या.
जागीच मृत्यू खडकांवर आपटल्यामुळे त्यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आणि प्रचंड रक्तस्रावामुळे कोमल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही क्षणांतच एक आनंदाचा ट्रेक दुःखद थरारात बदलला.
स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली धाव घटनेची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्ते संकेत खरात व रामभाऊ ढेबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कोमल यांचा मृतदेह गडाच्या राजसदरेजवळील पद्मावती माचीवर आणला. राजगडावरील सुरक्षा रक्षक विशाल पिलावरे यांनी सांगितले की कोमल चढताना की उतरताना पडल्या याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.
प्रशासनाची तत्काळ मदत घटनेबाबत माहिती मिळताच वेल्हे पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार ज्ञानदीप धिवार, पोलीस अंमलदार पी.एच. सुर्यवंशी, स्थानिक पोलीस पाटील विश्वास शिर्के, पुरातत्त्व विभागाचे पाहरेकरी बापू साबळे, तसेच हवेली आपत्ती व्यवस्थापनाचे तानाजी भोसले व त्यांच्या रेस्क्यू टीमने तात्काळ राजगड गाठला. रात्री उशिरा कोमल यांचा मृतदेह गडावरून खाली आणून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.