
Ayodhya Ram Mandir Video: अयोध्येमध्ये रामलला यांचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. रामलला यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभू रामलला यांचे निवासस्थान भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सज्ज केले जात आहे.
मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलला यांची मूर्ती विराजमान होणार आहे. श्री राम मंदिराची झलक पाहण्यासाठी रामभक्त आतुर झाले आहेत. राम मंदिराच्या आतील परिसरातील एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. डीडी न्यूजने 'X'वर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये मंदिराचे सौंदर्य, भव्यता आणि सुंदर सजावट पाहायला मिळत आहे.
रामललांच्या स्वागतासाठी मंदिरामध्ये सजावट
व्हिडीओमध्ये राम मंदिराची झलक पाहायला मिळत आहे. रामलला यांच्या स्वागतासाठी सुंदर पद्धतीने मंदिरामध्ये सजावट करण्यात येत आहे. संगमरवरीपासून उभारण्यात आलेल्या मंदिरामध्ये आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे. मंदिराचे स्तंभ रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहेत. संपूर्ण मंदिरामध्ये सुंदर-सुंदर फुलांनी मनमोहक सजावट करण्यात आली आहे.
राम मंदिराची खास झलक
डीडी न्यूजने व्हिडीओ पोस्ट करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “राम मंदिराच्या आतील भागाची खास झलक. शिल्पकौशल्य प्रेरणादायी आहे, जो भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा पुरावा आहे”.
रामललांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा
रामलला यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी शुभ मुहूर्तावर पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त 16 जानेवारीपासून विशेष पूजाविधीस सुरुवात झाली आहे.
रामलला यांच्या मूर्तीचे दर्शन
राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलला यांची 51 इंच उंचीची मूर्ती ठेवण्यात आली आहे. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही रामलला यांची सुंदर मूर्ती घडवली आहे. शुक्रवारी (19 जानेवारी) मूर्तीची पहिली झलक देशवासीयांना पाहायला मिळाली.
महाराष्ट्रात 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर
दरम्यान,रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य सरकारने 22 जानेवारी रोजी सर्व शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालय तसेच निमशासकीय कार्यालयांना सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.
आणखी वाचा
Ram Lalla Murti : श्री राम मंदिरातील रामललांच्या मूर्तीची पहिली झलक
VIDEO : पंतप्रधान मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित 6 स्मारक टपाल तिकिटे केली प्रसिद्ध