हिमेश रेशमियाच्या वडिलांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाच्या वडिलांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. वडील दीर्घकाळापासून आजारी होते. याशिवाय श्वसनासंबंधित समस्या होती असेही सांगितले जात आहे.

Chanda Mandavkar | Published : Sep 19, 2024 3:38 AM IST

Himesh Reshammiya Father Death : मनोरंजनच्या जगातून आणखी एक दु:खद बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. आता गायक हिमेश रेशमियाच्या वडिलांचे निधन झाले आहे. संगीतकार विपिन रेशमिया यांनी वयाच्या 78व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, विपिन रेशमिया दीर्घकाळापासून आजाराचा सामना करत होते. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, हिमेशची फॅमिली फ्रेंड फॅशन डिझाइनर वनिता थापरने त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. वनिता थापरने म्हटले की, विपिन रेशमिया यांच्यावर 19 सप्टेंबरला जुहू येथे अंत्यंसंस्कार केले जाणार आहेत. हिमेशच्या वडिलांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

वडिलांना गुरु मानायचा हिमेश
हिमेश रेशमिया वडील विपिन यांना गुरु मानत होता. हिमेशने वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते. अशातच वडिलांच्या निधनाने हिमेशसह परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला आहे. विपिन रेशमिया संगीतकारासह प्रोड्यूसरही होते. त्यांनी 'द एक्सपोज' आणि 'तेरा सुरूर' मध्ये प्रोड्युसरच्या रुपात काम केले होते. याच सिनेमांमध्ये हिमेशने मुख्य कलाकाराची भूमिकाही साकारली होती.

सलमान खान आणि विपिन रेशमिया एकाच सिनेमात काम करणार होते. यादरम्यान, हिमेशची भेट सलमान खानसोबत झाल्यानंतर त्याचे नशीब पालटले गेले. हिमेशला पहिल्यांदा सलमान-काजोलचा सिनेमा 'प्यार किया तो डरना क्या' साठी संगीत करण्याची संधी मिळाली होती.

कोण आहे हिमेश रेशमिया?
हिमेश रेशमिया बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार आहे. हिमेशने करियरमध्ये आतापर्यंत 1300 गाण्यांना संगीत दिले आहे. संगीतकारच्या रुपात हिमेशने पहिल्यांदा 'प्यार किया तो डरना क्या' साठी काम केले होते. यानंतर 'बंधन', 'हॅलो ब्रदर', 'दुल्हन हम ले जाएंगे', 'हमराज', 'तेरे नाम', 'एतराज', 'आशिक बनाया'सह काही सिनेमांसाठी संगीत दिले. हिमेश रेशमिया कलाकारही आहे. हिमेशने काही सिनेमात कलाकाराच्या रुपातही काम केले आहे. हिमेशचा आगामी सिनेमा 'बदमाश रविकुमार' असून 11 ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : 

कोलकाता हत्या प्रकरणात पीडितेच्या न्यायासाठी या अभिनेत्रीचे नृत्य

वडील घरी येण्याआधी कपडे बदलायच्या हेमा मालिनींच्या दोन्ही मुली, पण का?

Share this article