Auron Mein Kahan Dum Tha Review : अजय देवगण आणि तब्बू यांचा सिनेमा 'औरों में कहां दम था' शुक्रवारी रिलीज झाला आहे. सिनेमातील अनोखी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना भावूक करणारी आहे. पाहा सिनेमाचा रिव्हू सविस्तर...
Auron Mein Kahan Dum Tha Review in Marathi : गेल्या अनेक दिवसांपासून अजय देवगण (Ajay Devgan) आणि तब्बू (Tabbu) यांचा 'औरों में कहां दम था' सिनेमा कधी रिलीज होणार याची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात होती. अखेर शुक्रवारी सिनेमा सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले असून एका वेगळ्या आणि अनोख्या लव्ह स्टोरीची कथा मांडण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आला आहे. 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला 'औरों में कहां दम था' सिनेमात अजय देवगण आणि तब्बूसह सई मांजरेकर, शांतनु माहेश्वरी आणि जिमी शेरगिलही झळकणार आहे. पाहूयात अजय आणि तब्बूच्या सिनेमाचा संपूर्ण रिव्हू सविस्तर...
सिनेमाचा रिव्हू
‘बेबी’, ‘स्पेशल-26’, ‘नाम शबाना’, ‘अय्यारी’सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या नीरज पांडे यांनी यंदा हटके लव्ह स्टोरीवर आधारित सिनेमा तयार केला आहे. सिनेमाची कथाही नीरज पांडे यांनी लिहिली आहे. सिनेमाची कथा वर्ष 2000 ते वर्ष 2023 दरम्यानच्या काळावर आधारित आहे. यामध्ये कृष्णाच्या भूमिकेत अजय देवगण तर वसुंधराच्या भूमिकेत तब्बू झळकली आहे. या दोघांची तारुण्यातील भूमिका शांतनु माहेश्वरी आणि सई मांजरेकर यांनी साकारली आहे. सिनेमाची कथा कृष्णा आणि वसूच्या लव्हस्टोरीने होते. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम असले तरीही वसूला नेहमीच त्यांच्यामध्ये फूट पडली जाईल अशी भीती वाटत असते. अखेर, वसूची भीती सत्यात उतरल्याचे सिनेमाच्या कथेत दाखवण्यात आले आहे.
दुसऱ्या बाजूला कृष्णाला हत्येच्या आरोपाखाली आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते. यानंतर वसूचे लग्न दुसऱ्याच पुरुषाशी होते. पण कृष्णावरील वसूचे प्रेम चिमूटभरही कमी न झाल्याचे दाखवले आहे. याशिवाय वसू कृष्णा तुरुंगातून बाहेर येण्याची वाट पाहत राहते. सिनेमातील कथेत वसू आणि कृष्णाची लव्ह स्टोरी पूर्ण होणार का, हत्येच्या दिवशी नक्की काय घडले ज्यामुळे कृष्णाला शिक्षा झाली आणि या दोघांची लव्ह स्टोरी अपूर्ण झाली हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पहावा लागेल.
सिनेमातील पात्रांची भूमिका
'औरों में कहां दम था' सिनेमातील पात्रांनी साकारलेल्या भूमिकांबद्दल बोलायचे झाल्यास अजय देवगणने आपल्या भूमिकेला पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अजयची भूमिका प्रेक्षकांवर छाप पाडत आहे. याशिवाय अजय आणि तब्बूची जोडी नेहमीच प्रेक्षकांना पसंत पडली आहे. तब्बूनेही सिनेमात तगडी भूमिका केली आहे. तर शांतनु महेश्वरी आणि सईची भूमिका थोडी फिकी पडल्याचे दिसून आले.
सिनेमाचे दिग्दर्शन आणि संगीत
नेहमीप्रमाणेच आपल्या शानदार दिग्दर्शनातून नीरज पांडे यांनी प्रेक्षकांना खूश केले आहे. पण सिनेमात काही ठिकाणी चूकही झाल्याचे दिसून आले आहे. सिनेमातील गाणीही ठिकठाक आहेत.
प्रेक्षकांनी सिनेमा पहावा की नाही?
सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला 'औरों में कहां दम था' सिनेमा एक वेगळ्या लव्ह स्टोरीच्या कथेवर आधारित आहे. याशिवाय तब्बू-अजय देवगणचे चाहते असाल तर नक्कीच सिनेमा पाहू शकता.
आणखी वाचा :
Pushpa 2 सिनेमाचा क्लायमेक्स लीक? चाहते संतप्त होत म्हणाले डिलीट करा
रणबीर कपूरच्या Ramayan सिनेमासाठी चक्क मुंबईत अयोध्यानगरी उभी राहणार