बिल्डरने फसवले? घराच्या बांधकामात दोष आहेत? असा शिकवा धडा; 'RERA' कडे घरबसल्या तक्रार करून मिळवा न्याय!

Published : Dec 30, 2025, 03:37 PM IST

How To File RERA Complaint Online : घर खरेदीत बिल्डरकडून फसवणूक झाल्यास जसे की वेळेवर ताबा न मिळणे, निकृष्ट बांधकाम, RERA कायदा घरखरेदीदारांना संरक्षण देतो. या कायद्यांतर्गत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तक्रार दाखल करून ६० दिवसांच्या आत न्याय मिळवू शकता.

PREV
15
घरात दोष आढळले? RERA कडे अशी करा तक्रार

मुंबई : घर खरेदी करताना बिल्डरकडून दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात पूर्ण न होणं, ठरलेल्या वेळेत घराचा ताबा न मिळणं, निकृष्ट दर्जाचं बांधकाम, मंजूर नकाशात परस्पर बदल किंवा जाहिरातीत दाखवलेल्या सुविधा प्रत्यक्षात न मिळणं या तक्रारी आजही मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळतात. अशा अन्यायाविरोधात घरखरेदीदारांना सक्षम व्यासपीठ मिळावं आणि रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता व शिस्त यावी, यासाठी केंद्र सरकारने रिअल इस्टेट (नियमन व विकास) कायदा, 2016, म्हणजेच RERA लागू केला. 

25
RERA कायदा नेमका काय सांगतो?

RERA कायद्याचा प्रमुख उद्देश म्हणजे घरखरेदीदारांचे हक्क सुरक्षित करणे. या कायद्यानुसार 500 चौरस मीटरपेक्षा मोठा किंवा 8 पेक्षा अधिक सदनिका असलेला प्रत्येक निवासी व व्यावसायिक प्रकल्प संबंधित राज्याच्या RERA प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असणं बंधनकारक आहे.

नोंदणीशिवाय कोणताही प्रकल्प विक्रीस काढता येत नाही.

याशिवाय, खरेदीदारांनी भरलेली रक्कम सुरक्षित राहावी यासाठी बिल्डरला स्वतंत्र बँक खाते ठेवणं आवश्यक आहे. RERA अंतर्गत दाखल झालेल्या तक्रारींचा निकाल शक्यतो 60 दिवसांच्या आत लावण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे वर्षानुवर्षे न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची वेळ येत नाही. 

35
कोणत्या कारणांसाठी RERA कडे तक्रार करता येते?

घरखरेदीदार खालील परिस्थितींमध्ये RERA कडे अधिकृत तक्रार दाखल करू शकतो.

करारात नमूद केलेल्या तारखेपर्यंत फ्लॅटचा ताबा न मिळाल्यास

ताबा घेतल्यानंतर पाच वर्षांच्या आत स्ट्रक्चरल किंवा गंभीर बांधकाम दोष आढळल्यास

खरेदीदाराची परवानगी न घेता प्रकल्पाच्या आराखड्यात बदल केल्यास

जाहिरातीत दाखवलेल्या पार्किंग, गार्डन, स्विमिंग पूल यांसारख्या सुविधा न दिल्यास

दिशाभूल करणारी किंवा खोटी जाहिरात केल्यास

ही सर्व कारणं RERA अंतर्गत वैध तक्रारी मानली जातात. 

45
RERA कडे तक्रार कशी दाखल करायची?

RERA कडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन आणि सोपी करण्यात आली आहे. बहुतांश राज्यांमध्ये घरखरेदीदारांना सरकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज उरलेली नाही.

संबंधित राज्याच्या RERA अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या

“नोंदणी करा” किंवा “तक्रार दाखल करा” या पर्यायावर क्लिक करून खाते तयार करा

लॉगिन केल्यानंतर प्रकल्पाचं नाव, RERA नोंदणी क्रमांक, फ्लॅट व बुकिंग तपशील भरा

आपली तक्रार सविस्तर मांडून

उशिरासाठी भरपाई हवी आहे की

प्रकल्पातून बाहेर पडून व्याजासह परतावा हवा आहे, हे स्पष्ट नमूद करा

बिल्डर-खरेदीदार करार, पेमेंट पावत्या, वाटप पत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करा

निर्धारित सरकारी शुल्क ऑनलाइन भरल्यानंतर तक्रार अधिकृतपणे नोंदवली जाते 

55
घर खरेदीत फसवणूक झाली असेल तर वेळीच तक्रार दाखल करा

घर खरेदी ही आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक असते. जर त्या गुंतवणुकीत अन्याय झाला, तर गप्प बसण्याऐवजी RERA सारख्या कायदेशीर व्यासपीठाचा उपयोग करून आपले हक्क मिळवणे प्रत्येक घरखरेदीदारासाठी आवश्यक आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories