
Maruti Suzuki Fronx : सुझुकी फ्रॉन्क्सची नुकतीच ASEAN NCAP (न्यू कार असेसमेंट प्रोग्राम) द्वारे चाचणी करण्यात आली. या क्रॅश टेस्टमध्ये, गाडीने ७७.७० गुण मिळवून ५-स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त केले आहे. चाचणी केलेले मॉडेल इंडोनेशियातील सुझुकीच्या चिकारंग प्लांटमध्ये तयार केले आहे. हे मॉडेल लाओस, कंबोडिया, फिलीपिन्स, मलेशिया, व्हिएतनाम आणि थायलंडसारख्या बाजारपेठांमध्येही विकले जाते. चाचणी केलेल्या फ्रॉन्क्सचे वजन १०६० किलो असून, यात १.५-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये सुझुकी फ्रॉन्क्सने ३२ पैकी २९.३७ गुण मिळवले. ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये, स्थिर अडथळ्यावर आदळल्यावर मॉडेलने १६ पैकी १३.७४ गुण मिळवले. साइड इम्पॅक्टमध्ये ८ पैकी ७.६३ गुण मिळाले. हेड प्रोटेक्शन टेस्टमध्येही गाडीने ८ पैकी ८ गुण मिळवले. लहान मुलांच्या सुरक्षेमध्ये, फ्रॉन्क्सने ५१ पैकी ३८.९४ गुण मिळवले. पुढील आणि मागील बाजूस असलेल्या मुलांच्या डमींना चांगले संरक्षण मिळाले. फ्रंटल इम्पॅक्ट टेस्टमध्ये गाडीने १६ पैकी ९.९४ गुण मिळवले, तर साइड इम्पॅक्ट टेस्टमध्ये (८ पैकी ८) आणि इन्स्टॉलेशनमध्ये (१२ पैकी १२) पूर्ण गुण मिळवले. मोटारसायकल सुरक्षेमध्येही या कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हरला ५-स्टार रेटिंग मिळाले, ज्यात एकूण गुण अनुक्रमे २१ पैकी १६.५० आणि १६ पैकी ८ होते.
इंडोनेशिया-स्पेक सुझुकी फ्रॉन्क्सच्या सर्व व्हेरिएंटमध्ये सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), पुढच्या आणि मागच्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर सिस्टम (SBR), पादचारी संरक्षण (PP) आणि लहान मुलांच्या सीटसाठी ISOFIX माउंट्स देण्यात आले आहेत.
याशिवाय, या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये लेन डिपार्चर वॉर्निंग (LDW), फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग (FCW), लेन कीप असिस्ट (LKA), ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (AEB), ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन (BSD) आणि ऑटो हाय बीम (AHB) सारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये (ADAS) देखील आहेत.