
Mahindra Sets New Sales Record in October : देशातील लोकप्रिय एसयूव्ही ब्रँड महिंद्रा अँड महिंद्राने ऑक्टोबर २०२५ चे विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. कंपनीने केवळ युटिलिटी व्हेईकल (UV) विभागात आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली नाही, तर आयात आणि निर्यातीतही नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. गेल्या महिन्यात कंपनीने ७१,६२४ युनिट्सची विक्री केली. ऑक्टोबर २०२५ मधील एकूण विक्री (देशांतर्गत + निर्यात) १,२०,१४२ युनिट्स इतकी होती, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही २६% वाढ आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये विकल्या गेलेल्या १,००,२९८ युनिट्सपेक्षा ही कामगिरी खूपच चांगली होती. या विक्रीच्या आकड्यासह त्यांनी ह्युंदाईला मागे टाकले आहे.
कंपनीच्या सतत विकसित होत असलेल्या एसयूव्ही लाइनअपला जोरदार मागणी मिळाली आहे. युटिलिटी वाहनांची विक्री ७१,६२४ युनिट्सवर पोहोचली, जी कंपनीची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये विकल्या गेलेल्या ५४,५०४ युनिट्सच्या तुलनेत ही ३१ टक्के वार्षिक वाढ आहे. वार्षिक आधारावर (YTD) (एप्रिल-ऑक्टोबर २०२५) विक्रीतही १७% ची मजबूत वाढ होऊन ती ३,६९,१९४ युनिट्स झाली आहे. ही वाढ मागील वर्षी याच कालावधीत विकल्या गेलेल्या ३,१४,७१४ युनिट्सच्या तुलनेत आहे.
महिंद्रा थार, बोलेरो आणि बोलेरो निओच्या नवीन आवृत्त्या यूव्ही विभागात नव्याने दाखल होत आहेत. महिंद्राच्या BE आणि XUV लाइनअपमधील एसयूव्हींना ईव्ही विभागातही मोठी मागणी आहे. कंपनी २०२६-२७ या कालावधीत भारतात ८ नवीन एसयूव्ही लॉन्च करण्याची योजना आखत आहे.
कंपनीच्या विक्रीवर भाष्य करताना, ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे सीईओ नलिनीकांत गोलागुंडा म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये कंपनीने ७१,६२४ युनिट्स एसयूव्ही विक्री केली असून ३१ टक्के वाढ नोंदवली आहे. एका महिन्यात झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक एसयूव्ही विक्री आहे आणि एकूण वाहन विक्री १,२०,१४२ युनिट्स झाली आहे, जी मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत २६ टक्के जास्त आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
ऑक्टोबर २०२५ मध्ये महिंद्राने व्यावसायिक आणि तीन-चाकी वाहनांच्या विभागातही चांगली कामगिरी केली. २ टनाखालील LCV आणि २-३.५ टन LCV या दोन्ही विभागांमध्ये व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत सकारात्मक वाढ दिसून आली. ऑक्टोबर २०२५ मध्ये २ टनाखालील LCV विक्रीत १६% वाढ होऊन ती ४,५५९ युनिट्स झाली, जी ऑक्टोबर २०२४ मध्ये विकल्या गेलेल्या ३,९३५ युनिट्सपेक्षा जास्त आहे. तथापि, YTD विक्री ७% ने घटून २३,१२७ युनिट्सवरून २१,४४१ युनिट्स झाली.
LCV २-३.५ टन विभागात, विक्रीत १४% वार्षिक वाढ होऊन ती २७,१८२ युनिट्स झाली, जी २३,८९३ युनिट्सवरून वाढली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत YTD विक्री १३% ने वाढून १,४१,३५८ युनिट्स झाली. ही वाढ मागील वर्षी याच कालावधीत विकल्या गेलेल्या १,२५,५३६ युनिट्सच्या तुलनेत आहे. इलेक्ट्रिक वाहनांसह तीन-चाकी वाहनांच्या विक्रीत अनुक्रमे ३०% आणि ३२% वार्षिक वाढ झाली. ऑक्टोबर २०२४ मध्ये विकल्या गेलेल्या ९,८२६ युनिट्सच्या तुलनेत ऑक्टोबर २०२५ मध्ये १२,७६२ युनिट्सची विक्री झाली.