
Maruti Suzuki Brezza facelift will be launch in summer 2026 : भारतातील सर्वाधिक पसंतीची कॉम्पॅक्ट SUV मारुती सुझुकी ब्रेझा लवकरच एका मोठ्या अपडेटसह बाजारात येणार आहे. २०२२ मध्ये लाँच झाल्यापासून आतापर्यंत या कारच्या सुमारे ६ लाख युनिट्सची विक्री झाली असून, ही आपल्या सेगमेंटमधील 'बेस्ट-सेलिंग' कार ठरली आहे. सध्या दरमहा सरासरी १५००० युनिट्सची विक्री होत असताना, मारुती सुझुकी आता या मॉडेलचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
पुढील वर्षाच्या उन्हाळ्यात हे नवीन मॉडेल बाजारात उतरण्याची शक्यता आहे. नवीन ब्रेझामध्ये अपेक्षित असलेले ६ महत्त्वाचे बदल खालीलप्रमाणे आहेत:
सुरक्षेच्या दृष्टीने नवीन ब्रेझामध्ये 'लेव्हल २ एडास' (Advanced Driver Assistance Systems) हे तंत्रज्ञान दिले जाऊ शकते. यात लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, हाय बीम असिस्ट आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर यांसारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश असेल.
उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी नवीन मॉडेलमध्ये वेंटिलेटेड सीट्स मिळण्याची शक्यता आहे. यामुळे घामाचा त्रास कमी होऊन प्रवाशांना ताजेतवाने वाटेल. याशिवाय, ड्रायव्हर सीटसाठी इलेक्ट्रिक ॲडजस्टमेंटची सोय दिली जाऊ शकते, ज्यामुळे सीटची उंची आणि कोबं अधिक सोयीस्करपणे सेट करता येईल.
कारच्या अंतर्गत भागात हाय-टेक लूक देण्यासाठी १०.२५-इंचचा फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये ड्रायव्हरला हवे तसे थीम बदलण्याचे आणि हवी ती माहिती स्क्रीनवर पाहण्याचे पर्याय उपलब्ध असतील.
नवीन ब्रेझामध्ये १०.१-इंचची हाय-डेफिनिशन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते. यामध्ये वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोची सुविधा असेल. तसेच, युजर्सला थेट स्क्रीनवरून विविध ॲप्स वापरता यावेत यासाठी 'ॲप स्टोअर'चा सपोर्ट देखील मिळू शकतो.
सीएनजी मॉडेल वापरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असू शकते. नवीन ब्रेझामध्ये सीएनजी टाकी गाडीच्या बॉडीखाली बसवली जाण्याची शक्यता आहे. यामुळे डिकीतील जागा वाढेल आणि लांबच्या प्रवासासाठी जास्तीचे सामान नेणे सोपे होईल.
गाडीच्या बाह्य रूपातही काही बदल दिसतील. यामध्ये नवीन डिझाइनचे बंपर्स, आकर्षक हेडलॅम्प्स आणि टेललॅम्प्स तसेच नवीन १६-इंचचे अलॉय व्हील्स दिले जातील. गाडीच्या इंटिरिअरच्या मूळ रचनेत मात्र फारसा बदल अपेक्षित नाही.