
(Grain Adulteration) बंगळूर : हल्लीच्या काळात पॅकेटबंद वस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असल्याचे बघायला मिळते. मात्र त्यामुळे धान्यातील भेसळ ओळखणे कठीण झाले आहे. उच्च प्रतीच्या धान्यात इतर गोष्टी म्हणजे कमी प्रतीचे धान्य, खडे, माती, रंग मिसळणे म्हणजे भेसळ. यामुळे धान्याचा दर्जा तर घसरतोच शिवाय आरोग्याला धोका निर्माण होता. भेसळयुक्त धान्य वारंवार आपल्या खाण्यात आले तर यामुळे कर्करोग, यकृत आणि किडनीचे रोग होण्याची शक्यता असते.
आजच्या काळात आपण आधुनिक आहार पद्धती स्वीकारली आहे. पण, काय शुद्ध आहे आणि काय अशुद्ध आहे, हे ओळखणे एक मोठे आव्हान बनले आहे. या समस्येवर उपाय म्हणून बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड रिसर्च हॉस्पिटलच्या (IIAMR) विद्यार्थ्यांनी एक सोपा मार्ग दाखवला आहे.
शहरातील पॅलेस मैदानावर गुरुवारी आयोजित 'दुसऱ्या आयुर्वेद विश्व संमेलनात' IIAMR च्या विद्यार्थ्यांनी हे प्रात्यक्षिक सादर केले. 'डाळी, चहा पावडर, साखर, हिरवे वाटाणे, मध यांसारख्या वस्तू पाण्यात टाकल्यावर पाण्याचा रंग बदलल्यास त्यात भेसळ आहे हे सहज ओळखता येते. तूर डाळ, चणा डाळ पाण्यात टाकल्यावर तेलाचा अंश पाण्यावर तरंगतो आणि पाणी पिवळे होते.
चहा पावडर पाण्यात टाकल्यावर पाण्याचा रंग लगेच तपकिरी झाल्यास, चहा पावडरमध्ये भेसळ असल्याचे निश्चित होते. मध पाण्यात टाकल्यावर तो न विरघळता तळाशी जाऊन बसल्यास तो शुद्ध आहे, असे समजावे.
साखर पाण्यात टाकल्यास भेसळ म्हणून वापरलेला खडू पाण्यावर तरंगतो. अशा प्रकारे, अन्नपदार्थांची तपासणी कशी करता येईल, हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लोकांना प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिले.
काय शुद्ध आणि काय भेसळयुक्त आहे, हे ओळखण्यासाठी सोपे उपाय दाखवण्यासोबतच, देशी गाईचे शुद्ध तूप, घाण्याचे तेल, लाल तांदूळ, आणि घोसावळ्याच्या सालीपासून बनवलेले नैसर्गिक बाथ ब्रश यांसारखी स्वदेशी उत्पादने आकर्षणाचे केंद्र ठरली आहेत.
इतकेच नाही, तर अंगदुखी, कंबरदुखी, डोकेदुखीपासून ते गंभीर आजारांवर आयुर्वेदिक औषधे आणि गोळ्या उपलब्ध आहेत. भारतीय परंपरेचा भाग असलेल्या आयुर्वेदाचा अवलंब कसा करावा, यावर प्रसिद्ध लेखक आणि संशोधकांची पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध आहेत. हे सर्व बंगळूरमधील पॅलेस मैदानावर 25 ते 28 डिसेंबर दरम्यान 'काजे आयुर्वेदिक चॅरिटेबल फाऊंडेशन'च्या गेट क्रमांक 6 जवळील 'रॉयल सेनेट अँड द ग्रँड कॅसल'मध्ये आयोजित दुसऱ्या आयुर्वेद विश्व संमेलनात उपलब्ध आहे.
गुरुवारी या संमेलनाचे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन आणखी तीन दिवस नागरिकांसाठी खुले राहणार आहे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून, सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत भेट देता येईल.
आयुर्वेद विश्व संमेलनात आयुर्वेदाविषयी जनजागृती करण्यासाठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यात 20 हून अधिक महाविद्यालयांच्या विद्यार्थी संघांनी भाग घेतला आहे.
प्रत्येक संघाला 30 मिनिटांचा वेळ दिला जाईल. या वेळेत नृत्य, नाटक, संगीत, संवाद यांसारख्या माध्यमांतून आयुर्वेदाबद्दल जनजागृती करायची आहे. सर्वोत्तम सादरीकरण करणाऱ्या संघाला बक्षीस दिले जाईल. प्रथम पारितोषिक 3 लाख रुपये, द्वितीय 2 लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक 1 लाख रुपये आहे. याशिवाय 10 संघांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाईल.
आरोग्य आणि पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड
या मेळाव्यात जी.एम. एंटरप्रायझेसने आरोग्य आणि पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड्सचे प्रदर्शन केले आहे. कोरफड, पुदिना आणि केळीचा वापर करून हे सॅनिटरी पॅड तयार करण्यात आले आहेत. दिवसातून फक्त एक पॅड वापरणे पुरेसे आहे, वारंवार बदलण्याची गरज नाही. या पॅड्समध्ये सुमारे 250 मिली द्रव शोषून घेण्याची क्षमता आहे.