
मुंबई - नुकत्याच घडलेल्या विधीमंडळ परिसरातील गोंधळ आणि हाणामारीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त केली असून संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणीही केली आहे.
पडळकर म्हणाले, “काल जो काही प्रकार घडला त्याबद्दल मी विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली आहे, त्यांना सक्त ताकीद देऊन कारवाई करा, अशी विनंती अध्यक्षांकडे केली आहे. विधानसभेच्या आवारात जे काही घडतं, त्यावर अध्यक्ष कारवाई करतील. त्यामुळे यावर मी फार काही बोलणार नाही.”
पडळकर यांनी हाणामारीवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, “विधानसभेच्या आवारात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती सर्वोच्च असतात. आमचं या घटनेवर काहीच मत नाही. आम्ही कायद्याचा सन्मान करणारे कार्यकर्ते आहोत. आमच्यावर जी काही कारवाई होईल, त्याला आम्ही न्यायालयात सामोरे जाऊ.”
पडळकर यांनी नितीन देशमुख यांच्याशी संबंध फेटाळून लावत सांगितले की, “तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा नाही. विधीमंडळ परिसरात खूप गर्दी होती. मी एका कोपऱ्यात उभा होतो, फोटो काढत होतो. माझी लक्षवेधी सभागृहात होती, त्यावर चर्चा अपेक्षित होती. पण मंत्री अनुपस्थित असल्याने ती चर्चा होऊ शकली नाही.”
पडळकर पुढे म्हणाले, “मी सभागृहातून बाहेर पडल्यानंतर जे काही घडलं त्यावर मी काही बोलणार नाही. परंतु, आमच्या कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत, त्याबाबत मी अध्यक्षांचा आदर ठेवतो. पण आम्ही न्यायालयात आमचा मुद्दा मांडू.”
या हाणामारीचा केंद्रबिंदू असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी आपली बाजू नम्रपणे मांडली असली, तरी यामागे विरोधकांनी भाजपवर ‘हनीट्रॅप प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा डाव’ असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी असा दावा केला आहे की, नाशिकच्या एका भाजप नेत्याने हनीट्रॅपचा संपूर्ण प्लॅन तयार केला.
या पार्श्वभूमीवर पडळकर-आव्हाड समर्थकांमध्ये झालेली हाणामारी, भाजप व विरोधकांमध्ये वाढत चाललेला संघर्ष आणि विधानसभा परिसरात वाढती अस्थिरता, हे सर्व मिळून महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या वादळाची चाहूल देत आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणाला काय वळण लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.