Sion Road Over Bridge : सायन येथील 110 वर्ष जुना उड्डाण पुल दोन वर्षांसाठी राहणार बंद, या पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना

येत्या 21 जानेवारीपासून मुंबई उपनगरांना जोडणारा सायन येथील 110 वर्ष जुना उड्डाण पुल पुढील दोन वर्षांसाठी बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांना वाहतूकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Sion Road Over Bridge : सायन येथील 110 वर्ष जुना असलेला उड्डाण पुल नागरिकांना प्रवासासाठी येत्या 20 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. पण 21 जानेवारीपासून पुढील दोन वर्षांसाठी हा उड्डाण पुल बंद राहणार असल्याची सूचना मुंबई वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे. खरंतर 17 जानेवारीपासूनच सायन उड्डाण पुल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर 20 जानेवारीपर्यंत वाहतूकीसाठी सुरू ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला गेला.

सायन उड्डाण पुल बंद होणार असल्याने या ठिकाणी बॅरिकेडिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय, वाहतूककोंडी रोखण्यासाठी आसपासचे मार्ग आणि रस्त्यांवर 'नो एण्ट्री', 'नो पार्किंगचे' बोर्ड लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या पुलाची पुर्नबांधणी पुढील दोन वर्षात करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

21 जानेवारीपासून सायन उड्डाण पुल वाहतूकीसाठी बंद होणार
मुंबई वाहतूक मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी म्हटले की, सायन उड्डाणपुलावरील वाहतूक नव्याने बंद करण्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पुल बंद करण्यााधीच अधिसूचनेच्या माध्यमातून नागरिकांना याबद्दल सांगितले जात आहे.

माटुंगा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके यांनी म्हटले की, बुधवारी (17 जानेवारी) वाहतूकीसाठी पुल सुरू राहणार आहे. पण पुल तोडण्याचे काम सुरू झाल्यानंतर वाहतूकीसाठी बंद केला जाणार आहे. याशिवाय वाहने दुसऱ्या मार्गाने वळवण्याचे काम सुरू असल्याचे अन्य एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याशिवाय सायन उड्डाण पुलावर वाहनांसाठी एण्ट्री आणि एक्झिट पॉइंटवर पुलाच्या काही फूट दूर अंतरावर वाहने कोठून वळवावीत याबद्दलचे बोर्ड लावण्यात आले आहेत.

वॉर्डन तैनात करण्यात येणार
पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या सायन उड्डाण पुलाची पुर्नबांधणी करण्यात येणार असल्याने वॉर्डन तैनात करण्यात येणार आहेत. माहिम, चुनाभट्टी, बेकेसी, चेंबूर, धारावी सारख्या वाहतूक पोलिसांच्या अधिकार क्षेत्राच्या सीमेअंतर्गत 50-60 वॉर्डन तैनात करून वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या पर्यायी मार्गांचा करता येईल वापर
नागरिकांना आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी सायन उड्डाण पुलाऐवजी पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. यामध्ये कुर्ल्यातील इस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणारा सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, सुलोचना शेट्टी मार्गाच्या माध्यमातून सायन हॉस्पिटल रोड, जो डॉ. बीए रोडला धारावीतील कुंभारवाडा आणि चुनाभट्टी-वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स कनेक्टरने जोडला जातो. या पर्यायी मार्गांचा नागरिकांना वाहतूकीसाठी वापर करता येईल. दरम्यान, या मार्गांवर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना वाहतूकीसाठी परवानगी नसणार आहे.

आणखी वाचा : 

Parel Bridge Accident : मुंबईतील परळ पुलावर मोटरसायकल आणि डंपरमध्ये जोरदार धडक, अपघातात तिघांचा मृत्यू

मुंबईकरांसाठी अटल सेतू बनला पिकनिक स्पॉट, सेल्फी काढण्यासाठी थांबल्यास पोलिसांकडून दाखल केला जाणार FIR

बोरिवलीत पतंगीच्या मांजाने घेतला 21 वर्षीय तरुणाचा जीव, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल

Share this article