
Maharashtra : महागाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण योजना’वर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र टीका केली आहे. महिलांना दरमहा दिले जाणारे १५०० रुपये अपुरे असून अशा योजनांमुळे केवळ मतांची खरेदी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिकमधील संयुक्त सभेत राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर आणि भाजपवर आक्रमक शब्दांत निशाणा साधला.
राज ठाकरे म्हणाले की, सध्याच्या महागाईत १५०० रुपयांचे मूल्य फारसे उरलेले नाही. घरगुती गॅस सिलेंडरच १००० रुपयांच्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत महिलांना मिळणारी रक्कम अवघ्या १५ दिवसांत संपते, मग उरलेले महिने कसे काढायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या योजनांमधून सरकार लोकांना जाती-धर्माच्या नावाखाली भुलवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे मतदारांनी चुकीचा निर्णय घेतल्यास त्याचा फटका पुढील पिढ्यांना बसेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. “आमचं शहर तसंच राहिलं, विकास झाला नाही. आमचा बाप विकला गेला, आईने पैसे घेतले,” असे तुमचीच मुलं उद्या म्हणतील, असे सांगत त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले.
जर असे भविष्य टाळायचे असेल, तर मनसे-शिवसेनेच्या नगरसेवकांना निवडून द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार वर्षे पुढे ढकलण्यावरही त्यांनी सवाल उपस्थित केला आणि सत्ताधाऱ्यांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी केली.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर उपरोधिक टीका करत, “१९५२ साली जन्माला आलेल्या पक्षाला २०२६ मध्येही दुसऱ्याची पोरे दत्तक घ्यावी लागतात,” असे म्हणत भाजपची खिल्ली उडवली. तसेच निवडणुकीच्या काळात नाशिक दत्तक घेण्याची घोषणा करणारे नेते नंतर शहरात फिरकलेच नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनाही राज ठाकरे यांनी लक्ष्य केले. एका कथेतून त्यांनी टोला लगावत, आधी पक्षातील कार्यकर्ते ‘छाटले’ गेले आणि आता बाहेरून लोक आणले जात असल्याचा आरोप केला.