
Mumbai : राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान झाले आणि 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी अनेक राजकीय समीकरणे बदलणाऱ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. युती, फूट आणि स्थानिक राजकारणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना धक्के बसले. यामध्ये सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांना बसला असून, त्यांच्या मुंब्रा मतदारसंघात एमआयएमने जोरदार मुसंडी मारली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युती म्हणून निवडणूक लढवली. दुसरीकडे अजित पवार यांनी भाजपची साथ सोडत काका शरद पवारांसोबत निवडणूक लढवली. या निर्णयाचा थेट फटका अजित पवार गटाला बसला असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी हार स्वीकारावी लागली. अनेक ठिकाणी पक्षांनी स्थानिक परिस्थितीनुसार स्वतंत्र किंवा युतीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
मुंब्रा परिसरात अनेक वर्षांपासून जितेंद्र आव्हाडांचे राजकीय वर्चस्व राहिले आहे. मात्र, यावेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत एमआयएमची दमदार एन्ट्री झाली आहे. थेट एमआयएमकडून निवडणूक लढवून सहर शेख ही तरुणी नगरसेविका म्हणून निवडून आली असून, तिने थेट जितेंद्र आव्हाडांना खुले आव्हान दिले आहे. या निकालामुळे मुंब्रातील राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र आहे.
नवनियुक्त नगरसेविका सहर शेख हिने विजयानंतर केलेल्या विधानाने मोठी खळबळ उडवली आहे. “एमआयएमच्या पतंगाचा रंग हिरवा आहे आणि संपूर्ण मुंब्राचा रंग मला हिरवा करून टाकायचा आहे,” असे ती म्हणाली. तसेच “एमआयएमच्या पतंगामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे,” असे विधान करत तिने आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.
सहर शेखने उमेदवारीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ती म्हणाली, “माझे वडील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून पक्षासाठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. शेवटपर्यंत जितेंद्र आव्हाड उमेदवारी देण्याबाबत बोलत होते, मात्र त्यांनी शब्द फिरवला.” अखेर अजित पवार गट आणि एमआयएम या दोन्हींचे एबी फॉर्म समोर असताना, अल्लाहचा संदेश म्हणून एमआयएमचा फॉर्म स्वीकारल्याचे तिने सांगितले.