
Mumbai Mayor Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकत मोठे यश मिळवले असले, तरी मुंबईच्या महापौरपदाचा पेच अद्याप सुटलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत गटनोंदणी आणि महत्त्वाच्या पदांबाबत एकमत न झाल्याने महापौर निवडणूक (Mumbai Mayor Election 2026) लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महानगरपालिकेतील भाजप आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांची गटनोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाला महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला आहे. आधी 31 जानेवारी रोजी मतदान घेण्याचा निर्णय होता, मात्र सध्याच्या परिस्थितीत ही निवडणूक फेब्रुवारीतच होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून हे पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. त्यानंतर पालिका प्रशासनाने 31 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता मतदान घेण्याचे निर्देश दिले होते. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत सूचना जारी केल्या होत्या. मात्र, युतीतील मतभेदांमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
महापौरपदावर भाजपने स्पष्ट दावा केला आहे. दुसरीकडे, शिंदे गटाच्या शिवसेनेनेही महापौरपद किंवा स्थायी समिती अध्यक्षपदावर आपला हक्क सांगितला आहे. तसेच इतर महत्त्वाच्या पदांवरूनही दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. वरिष्ठ नेत्यांमध्ये शुक्रवारी रात्री बैठक झाली असली, तरी अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही.
मुंबई महानगरपालिकेत भाजपचे 89 आणि शिंदे सेनेचे 29 नगरसेवक असून दोन्ही पक्षांकडे मिळून 118 चे बहुमत आहे. तरीही गटनोंदणी आणि पदवाटपावर सहमती न झाल्याने महापौर निवड प्रक्रियेला विलंब होत आहे. गटनोंदणी पूर्ण झाल्यानंतरच महापौर निवडणुकीला गती मिळेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.