
मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात रविवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. मंडाला येथील जनता नगर परिसरातील तीन मजली चाळीचा काही भाग अचानक कोसळला गेला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. एकजण जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. याबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर शेअर करण्यात आली आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांकडून मृत परिवाराच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकार या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबाच्या मागे खंबीर उभे असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुंबईतील मानखुर्द भागात एक घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या प्रसंगात त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही त्यांनी म्हटले असून…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 6, 2026
ही दुर्घटना रविवारी (5 जुलै) रात्री सुमारे 8.30 वाजताच्या आसपास मंडाला परिसरातील जनता नगर येथील चाळ क्रमांक 5 मध्ये घडली. प्राथमिक माहितीनुसार, तीन मजली चाळीतील दोन ते तीन खोल्या अचानक कोसळल्या गेल्या. स्थानिकांच्या मते, कोसळलेल्या भिंतीचा काही भाग आजूबाजूला असणाऱ्या झोपड्यांवरही पडला गेला.
महापालिकेच्या माहितीनुसार, दुर्घटनेत चार महिला आणि दोन पुरुषांचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. याच्यावर गोवंडीमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनीही जखमीसह कुटुंबियांची भेट घेतली.
घटनेनंतर अग्निशमन दल, मुंबई पोलीस, महापालिका, '108' रुग्णवाहिका सेवा आणि एनडीआरएफ (NDRF) यांची पथके घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
सोमवारीही मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतूकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. मुंबई-पुणे दरम्यानच्या काही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या प्रभावित झाल्या आहेत. याशिवाय रायगडमधील उपनगरी रेल्वे सेवेलाही फटका बसला आहे. हवामान खात्याने आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनावश्यक कारणास्तव घराबाहेर पडू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.