
मुंबई : मुंबईच्या दक्षिण भागातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या कर्नाक पुलाचे नामकरण आता ‘सिंदूर पूल’ म्हणून करण्यात आले आहे. या पुलाचे 10 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. भारताने पाकिस्तानविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला समर्पित करत हे नाव देण्यात आले आहे.
मशीद बंदर रेल्वे स्थानक आणि पी. डि' मेलो मार्गाला जोडणारा हा पूल, पूर्व आणि पश्चिम मुंबई यांना एकत्र जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पुलाची पुनर्बांधणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मध्य रेल्वेच्या आराखड्यानुसार केली असून, अवघ्या काही वर्षांत हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. 10 जून 2025 रोजी पुलाचे सर्व बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
हा पूल 328 मीटर लांब असून त्यातील 70 मीटर भाग रेल्वेच्या हद्दीत आहे. पुलाच्या दोन्ही टोकांना पोहोच रस्त्यांची एकूण लांबी 230 मीटर असून, त्यापैकी पूर्वेकडील 130 मीटर आणि पश्चिमेकडील 100 मीटर इतकी आहे. पुलाच्या उभारणीत प्रत्येकी 550 मेट्रिक टन वजनाचे 70 मीटर लांब, 26.50 मीटर रूंद आणि 10.8 मीटर उंचीचे आरसीसी तुळया (गर्डर) बसवण्यात आले आहेत.
या पुलाच्या कार्यान्वयनानंतर पी. डि' मेलो मार्ग, वालचंद हिराचंद मार्ग, शहीद भगतसिंग मार्ग, युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली रोड, काझी सय्यद रोड आणि सरदार वल्लभभाई पटेल मार्ग या मार्गांवरील वाहतूक सुरळीत होणार आहे. दशकभर पूर्व-पश्चिम वाहतूक अडथळ्यामुळे निर्माण झालेली समस्या या पुलाच्या सुरू झाल्यानंतर सुटण्याची शक्यता आहे. पुलाचे नाव बदलून ‘सिंदूर’ ठेवले गेले असल्यामुळे याला राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेला ऐतिहासिक संदर्भ देखील लाभला आहे.
दरम्यान, कर्नाक पूल 150 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता, मात्र तो धोकादायक झाल्याने ऑगस्ट 2022 मध्ये तो पाडण्यात आला. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) या पुलाची पुनर्बांधणी केली. नव्या पुलाची एकूण लांबी 328 मीटर असून त्यात 70 मीटर रेल्वे हद्दीत आहे, तर उर्वरित भाग पोहोच रस्ते आहेत.