
मुंबई : मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या वेळी कारण ठरलं आहे मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा नशेत धिंगाणा आणि त्याचा व्हिडीओ, जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
राजश्री मोरेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून राहिल शेख या तरुणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तो मनसेचे पदाधिकारी जावेद शेख यांचा मुलगा असून, व्हिडीओमध्ये तो अर्धनग्न अवस्थेत राजश्रीला शिवीगाळ आणि धमकी देताना दिसतोय. तो म्हणतो, "… पैसे घे... पोलिसांकडे जा... मी जावेद शेखचा मुलगा आहे... मग तुला कळेल!"
घटना रविवारी रात्रीची आहे. राजश्रीच्या गाडीला झालेल्या अपघातामागे राहिल शेख मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, असा गंभीर आरोप तिच्याकडून करण्यात आला आहे. या अपघातानंतर झालेल्या वादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. व्हिडीओमध्ये तो पोलिसांशीही आक्रमकपणे वागताना आणि त्यांच्याशी हुज्जत घालताना दिसतो.
राजश्रीने या प्रकरणात एफआयआर दाखल केला असून, त्याची प्रतही तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. इतकंच नव्हे तर, तिने सांगितले की एफआयआर नोंदवल्यापासून मनसे कार्यकर्त्यांकडून तिला सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत.
यापूर्वी राजश्रीने "मराठी लोकांनी आधी मेहनत करायला शिकावं" असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं आणि मनसेने तिच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. नंतर तिने तो व्हिडीओ हटवून माफीनामा सादर केला.
राजश्रीच्या नव्या व्हिडीओवर नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. "त्याला राज ठाकरेंसमोर उभं करा!" "ताई, तू योग्य वागलीस. आता याला धडा शिकव." "राजकीय घरात जन्म झाला की कायद्यापेक्षा वरचं वागतात!" अशा कमेंट्स सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.
या प्रकारातून पुन्हा एकदा राजकीय घराण्यातील मुले ‘बापाच्या नावावर’ धमक्या देतात ही मानसिकता समोर आली आहे. या प्रकरणावर मनसे प्रमुख राज ठाकरे काय भूमिका घेतात आणि पोलिसांची कारवाई किती प्रभावी ठरते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.