
मुंबई | प्रतिनिधी मुंबईत एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला केवळ मराठीत बोलला नाही म्हणून माफी मागावी लागल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पक्षाच्या कार्यालयात बोलावून घेतले, तिथे त्याने “मराठी शिकेन आणि अशी चूक पुन्हा होऊ देणार नाही” असे सांगत माफी मागितली. मात्र, या प्रकरणावर नेटिझन्सचे मिश्र आणि काहीसे संतप्त मत उमटत आहेत.
व्हिडीओमध्ये डिलिव्हरी बॉयला काहीसा संकोच करत माफी मागताना पाहिलं गेलं. "मी मराठी शिकेन, ही चूक पुन्हा होणार नाही" हे शब्द त्याने उच्चारले, पण हे त्याच्या मनातून होते की दबावाखाली – यावर समाजमाध्यमं दोन गटात विभागली गेली आहेत.
काही जण म्हणत आहेत की, "मराठीचा अभिमान बाळगणं वेगळं आणि दुसऱ्याला दबावाखाली वागायला लावणं वेगळं". #NotMyMaharashtra आणि #LanguageFreedom सारखे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले आहेत. अनेकांनी हे प्रकरण “भाषेच्या प्रेमाऐवजी भीती पसरवणारे” असल्याची टीका केली.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी या कृतीचं समर्थन करत सांगितलं की, "मराठी ही राज्याची भाषा आहे आणि इथं राहणाऱ्यांनी ती बोलणं अपेक्षित आहे." त्यांच्या मते, हे कुणालाही अपमानित करण्यासाठी नव्हतं, तर ‘जाणीव जागृती’साठी होतं.
या घटनेनं मुंबईसारख्या बहुभाषिक शहरात भाषिक असहिष्णुतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. कामाच्या ठिकाणी भाषेचा आग्रह कितपत योग्य, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.