
ठाणे | प्रतिनिधी शहरात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या विळख्यात सरकारी यंत्रणा अडकताना दिसत आहेत. वसई-विरार महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक रेड्डी यांच्या घरावर ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने छापा टाकत तब्बल २३ कोटी रुपयांचे सोनं आणि ८ कोटींची रोकड जप्त केली आहे. या धक्कादायक कारवाईमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
रेड्डी हे शासकीय अधिकारी असूनही त्यांच्याकडे एवढ्या प्रचंड प्रमाणात मालमत्ता कशी आली, याचा तपास आता सुरु झाला आहे. ईडीच्या अधिकार्यांनी माहितीवरून केलेल्या या कारवाईत त्यांच्या राहत्या घरात सोनं, हिरे, विदेशी चलन आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, रेड्डी यांच्यावर अनेक काळापासून भ्रष्टाचाराचे आरोप होते. काही विकास प्रकल्पांमध्ये भूमी आरक्षण व वापर बदल प्रकरणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवरच ईडीने अचानक छापा टाकून हा खजिना उघड केला.
वसई-विरार शहर झपाट्याने विकसित होत असताना, नागरी सुविधा अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत सरकारी अधिकारी एवढा काळा पैसा जमवत असल्याचे उघड होणे, हे सामान्य नागरिकांच्या विश्वासाला तडा देणारे आहे.
या कारवाईमागे राजकीय हेतू आहेत का, असा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी यास पूर्णपणे तपासाधारित कारवाई असल्याचे स्पष्ट केले आहे. यापुढे अधिकच जाचक चौकशी होण्याची शक्यता आहे.