
मुंबई | प्रतिनिधी मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना भाषेवरून सुरू झालेलं वादाचं रुपांतर थेट ‘जुबानी युद्धा’त झालं. एका पुरुषाने महिलेला “मराठीत बोला” असं सांगितल्यावर तिने संतप्त होत “माझी जुबान, माझी मर्जी” असं म्हणत ठाम प्रतिवाद केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
व्हिडीओमध्ये दिसतं की, एका व्यक्तीने महिलेच्या हिंदीतून बोलण्यावर आक्षेप घेतला आणि तिला मराठीत बोलण्यास सांगितलं. त्यावर महिला म्हणते, “तुमी मला आदेश देणार कोण? माझी भाषा काय बोलायची, हे मी ठरवणार.” तिचा आत्मविश्वास आणि स्पष्टवक्तेपणा पाहून आसपासचे प्रवासीही थक्क झाले.
ही घटना पुढे येताच ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावर यावर चर्चा पेटली आहे. एक गट महिलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभा राहिला आहे, तर दुसरा गट मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषेचा आग्रह धरतो आहे.
काही नेटकऱ्यांनी म्हटलं, “भाषेवरून वाद नको, मुंबई ही विविधतेचं प्रतिक आहे.” तर काहींनी ‘मराठी माणसांनी मराठीच बोलावं’ असं ठाम मत मांडलं. मात्र बहुतांश लोकांनी महिलेनं आपल्या मतासाठी उभं राहिलं, हे कौतुकास्पद असल्याचं सांगितलं.