Gauri Garje Palve Death Case : डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ; पंकजा मुंडेंची कुटुंबीयांशी भेट, “अनंत गर्जे दोषी असेल तर सुटणार नाही”

Published : Nov 26, 2025, 10:28 AM IST
Gauri Garje Palve Death Case

सार

Gauri Garje Palve Death Case : डॉ. गौरी पालवे यांच्या मृत्यूने निर्माण झालेल्या खळबळीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना भेटून सांत्वन केले. पालवे कुटुंबाने गौरीची हत्या झाल्याचा आरोप केला. 

Gauri Garje Palve Death Case : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूने (Gauri Garje Palve Death Case) राज्यभरात तीव्र खळबळ उडाली आहे. गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले असले तरी, “आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नसून तिची हत्या करण्यात आली,” असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि गौरींचे पती अनंत गर्जे यांना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना पंकजा मुंडे यांनी स्वतः बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावात जाऊन गौरींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पंकजा मुंडे घरात शिरताच गौरींचे वडील अशोक पालवे दु:खाने कोसळले आणि टाहो फोडला. हा क्षण एवढा भावनिक होता की मुंडेदेखील स्वतःला आवरू शकल्या नाहीत. या भेटीदरम्यान पालवे कुटुंबाने आपल्या मुलीला न्याय मिळावा, तिच्या मृत्यूचा सत्य शोधून काढावा अशी मागणी मंत्री मुंडे यांच्यासमोर मांडली.

कुटुंबीयांच्या व्यथा ऐकताना पंकजा मुंडे यांनी या घटनेबद्दल आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केली. “मला गौरीला होणाऱ्या त्रासाची काहीच कल्पना नव्हती. माहिती असती तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी कोणालाही फोन करून मदत करण्याचा किंवा कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नसल्याचेही त्यांनी ठाम शब्दात स्पष्ट केले. “भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते की मी या प्रकरणात कोणालाही वाचवत नाही. माझ्याकडे दहा पीए आहेत, पगारी लोकांच्या घरात काय चालू आहे हे मला कसे कळणार? मला जर काही माहिती असती तर मी त्याच दिवशी कारवाई केली असती,” असे म्हणत त्यांनी स्वतःवर येणारे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, गौरी आणि अनंत हे गणपती पाहण्यासाठी त्यांच्या घरी आले असता त्यांच्यात काहीच बिनसलंय याची कल्पना नव्हती, हेही त्यांनी सांगितले. “माझा मुलगा असा वागला असता तर मी त्याचाही निषेध केला असता,” असे त्यांनी कुटुंबीयांना आश्वस्त करत सांगितले.

तपासाबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “पोलिस तपास करत आहेत. दोन दिवसात कोणताही तपास पूर्ण होत नाही. पोलिस ज्या केसमध्ये पुरावे कमी असतात त्या केसचाही छडा शोधतात. अनंत गर्जे या प्रकरणात दोषी असेल तर त्याला शिक्षा होणारच. या पृथ्वीवर कोणीही अनंत गर्जेची बाजू घेत नाही. मग पोलिसांना तपास करु दिलाच पाहिजे.” त्यांनी पालवे कुटुंबाला धीर देत सांगितले की, “मला तुमचं दुःख समजतं. आपल्या लेकीसोबत असं झालं तर मला काय वाटेल तेच मला कळतं. पण तपासाला वेळ द्यायला हवा.”

दरम्यान, गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचा आरोप तिचे वडील अशोक पालवे आणि आई अलकनंदा पालवे यांनी ठामपणे केला आहे. त्यामुळे हा तपास आणखी गंभीर वळणावर आला आहे. घटनेनंतर सामाजिक माध्यमांत आणि राज्यात राजकीय पातळीवरही या प्रकरणात मोठी चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडेंची गौरींच्या माहेरी भेट, कुटुंबीयांच्या भावना आणि मंत्री मुंडेंची प्रतिक्रिया यामुळे प्रकरणाला नवी दिशा मिळत आहे. राज्याचे लक्ष आता पोलिस तपास आणि पुढील घडामोडींवर खिळले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट
नायरा एनर्जी बनली गोवा येथील इंडिया H.O.G.™️ रॅली 2025 ची अधिकृत फ्यूलिंग पार्टनर