
BMC Election 2025 : आगामी बीएमसी निवडणुकीत प्रभाग क्रमांक २०७ मध्ये गवळी कुटुंबातीलच थेट सामना पाहायला मिळणार आहे. माजी आमदार अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी आणि त्यांची वहिनी तसेच माजी नगरसेविका वंदना गवळी या दोघींनी एकाच प्रभागातून आपली उमेदवारी समाजमाध्यमांवर जाहीर केली आहे. त्यामुळे हा प्रभाग आता विशेष चर्चेत आला आहे.
काही दिवसांपूर्वीच अरुण गवळी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिका चर्चेत होत्या. त्यांनी सक्रिय निवडणुकीत न उतरता आपली अखिल भारतीय सेना येत्या महानगरपालिका निवडणुकीत उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गवळी यांच्या मुलगी व माजी नगरसेविका गीता गवळी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्याची तयारी केली जात आहे. या वेळी गवळी यांच्या दोन्ही मुली मैदानात उतरणार असून योगिता गवळी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
महापालिकेच्या प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर योगिता गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “भायखळ्याच्या विकासासाठी मी प्रभाग २०७ मधून इच्छुक उमेदवार आहे,” असे जाहीर केले. त्यांच्या या घोषणेनंतरच वंदना गवळी यांनीही सोशल मीडियावरून स्वतःची निवडणूक तयारी दर्शवत लढतीचे संकेत दिले. परिणामी दोन्ही गवळी महिलांमध्ये सरळ संघर्ष निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, प्रारुप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर अनेक तक्रारी समोर येत आहेत. एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात जोडल्या जाण्याच्या, तसेच शहराजवळील ग्रामपंचायत हद्दीतील मतदारांची नावे मतदारयादीत समाविष्ट झाल्याच्या अडचणी नागरिकांनी नोंदवल्या. या सर्व हरकतींची दखल घेऊन आवश्यक दुरुस्त्या केल्या जातील, असे आश्वासन महापालिका आयुक्त मानसी मीना यांनी दिले आहे.
“मतदारयादीतील चुकांमुळे कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनी आपली नावे पडताळून घ्यावीत,” असे आवाहन शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले. भाजपाच्या शिष्टमंडळानेही या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासकांशी चर्चा करून तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.