
Dahisar Kashigaon Metro Line 9 : मिरा-भाईंदरकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दहिसर ते काशीगाव या मार्गावरील मेट्रो 9 प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या मेट्रो मार्गामुळे मुंबई आणि मिरा-भाईंदरदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असून, वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्नही कमी होण्याची शक्यता आहे.
मुंबई मेट्रो 9 ही मुंबई मेट्रो प्रकल्पातील एक महत्त्वाची लाईन असून ती दहिसर ते काशीगाव दरम्यान धावणार आहे. या लाईनला मेट्रो 7 शी जोडण्यात आले आहे, त्यामुळे प्रवाशांना आता थेट अंधेरीपर्यंत प्रवास करता येणार आहे. एमएमआरडीएने या मार्गिकेसाठी सर्व तयारी पूर्ण केली असून गुंदवली ते काशिगाव असा थेट प्रवास शक्य होणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरांमध्ये प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे.
सध्या दहिसर ते काशीगाव हा प्रवास रस्त्याने साधारण 30 ते 45 मिनिटांचा होतो. मात्र मेट्रो सुरू झाल्यानंतर हा प्रवास केवळ 10 ते 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. यामुळे केवळ वेळेची बचतच नाही तर वाहतूक कोंडी आणि प्रदूषणातही घट होईल. मिरा-भाईंदर परिसरातील नागरिकांना रोजच्या कामासाठी, शिक्षणासाठी आणि व्यवसायासाठी मोठा फायदा होणार आहे.
या मेट्रो मार्गावर दहिसर, पांडुरंग वाडी, मिरा गाव आणि काशीगाव अशी चार महत्त्वाची स्थानके असतील. पूर्णपणे एलिव्हेटेड असलेल्या या मेट्रोमध्ये वातानुकूलित डबे, स्मार्ट कार्ड व QR कोड तिकीट सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असणार आहे. मेट्रो 7 आणि मेट्रो 9 एकत्रित कॉरिडॉरमुळे अंधेरी पूर्व ते काशिगाव दरम्यान अखंड प्रवास शक्य होणार आहे.
मेट्रो सेवा सकाळी सुमारे 5.50 वाजता सुरू होईल आणि रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहील. गर्दीच्या वेळेत दर 5-6 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल, तर इतर वेळेत 8 ते 10 मिनिटांच्या अंतराने गाड्या धावतील. आठवड्याच्या दिवशी सुमारे 276 फेऱ्या, शनिवारी 223 आणि रविवारी 205 फेऱ्या होणार आहेत.