
मुंबई - राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मोठा आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विधानसभेत थेट हनी ट्रॅप प्रकरणाशी संबंधित पेन ड्राइव्ह सादर करत खळबळ उडवून दिली आहे. या पेन ड्राइव्हमध्ये ७२ अधिकाऱ्यांचे व काही मंत्र्यांचे अत्यंत संवेदनशील व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केला असून, राज्य सरकार या प्रकरणावर गप्प का आहे, असा सवाल त्यांनी विधानसभेत उपस्थित केला.
या प्रकरणाचा मास्टरमाइंड नाशिकचा असून, तो एका मोठ्या राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी असल्याचे वृत्त आहे. नाशिक, मुंबई आणि ठाणे येथे हनी ट्रॅप लावून मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना अडकवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या जाळ्यात अडकलेल्यांचे गुप्त चित्रीकरण करून त्यांच्याकडून खंडणीची मागणी करण्यात आली, असा आरोपही समोर येत आहे.
विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले, "माझा हेतू कोणाचेही चारित्र्यहनन करणे नाही. मात्र सरकार या प्रकरणावर संवेदनशील आहे का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. माझ्याकडे हनी ट्रॅप प्रकरणाचा पेन ड्राइव्ह आहे. सरकारला तो पाहिजे असेल तर मी तो देण्यास तयार आहे." यावर सत्ताधारी आमदारांनी ‘पेन ड्राईव्हमध्ये काय आहे’ असा सवाल केला असता, पटोले म्हणाले, "तुमच्या मंत्र्यांचे प्रताप पाहायचे असतील आणि सरकारला त्याचे काही वाटत नसेल, तर अवश्य मी पेन ड्राइव्ह देतो."
राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे की, गेल्या दोन आठवड्यांपासून या प्रकरणावर मौन पाळले जात आहे आणि पडद्यामागे वाटाघाटी व तडजोडी सुरू आहेत. काही नामांकित नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले आहे. संबंधित महिलेने नाशिक, मुंबई आणि अन्य ठिकाणीही हनी ट्रॅप लावल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विरोधकांच्या आरोपावर उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, "राज्यातील कोणताही सरकारी अधिकारी, माजी किंवा सध्याचा मंत्री हनी ट्रॅप प्रकरणात अडकलेला आढळल्यास सरकार त्याची सखोल चौकशी करेल." त्यांनी विरोधकांना सूचना दिली की, त्यांनी जर कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध करून दिले, तर सरकार कारवाईस मागे-पुढे पाहणार नाही.
या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. अनेक राजकीय नेत्यांची नावे दबक्या आवाजात घेतली जात आहेत. काहींच्या बाबतीत व्हिडिओ क्लिप्स असल्याचीही चर्चा आहे. नाना पटोले यांनी जरी थेट कोणाचे नाव घेतलेले नसले, तरी विधानसभेत पेन ड्राइव्ह दाखवून त्यांनी सरकारवर दबाव वाढवला आहे.