
मुंबई - विक्रोळी येथील एका मारवाडी दुकानदाराने व्हॉट्सअॅपवर ‘मराठी माणसांचा अपमान’ करणारी स्टेटस पोस्ट केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याला दुकानाबाहेर गाठून शारीरिक मारहाण केली आणि जबरदस्तीने सार्वजनिक माफी मागायला लावली.
ही घटना दुकानासमोर घडली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मनसे कार्यकर्ते दुकानदाराला कान धरून हात जोडून माफी मागायला लावताना दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये मनसेचे कार्यकर्ते इतरांना देखील मराठी भाषा आणि संस्कृतीचा अवमान करू नये, असा इशारा देताना दिसत आहेत. त्याचबरोबर मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींच्या दुकानांवर बहिष्कार टाका, असं आवाहनही त्यांनी स्थानिक नागरिकांना केलं. मनसे कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मराठी माणसाला कमी लेखणाऱ्या वृत्तीला महाराष्ट्रात थारा दिला जाणार नाही. त्यामुळे मराठी माणसाचा अवमान करणाऱ्यांना जाहीरपणे माफी मागावीच लागेल.
ही घटना घडण्याच्या काहीच दिवसांपूर्वी, ठाण्यात देखील एका फूड स्टॉल मालकाला मराठीत न बोलल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.त्या प्रकरणाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मनसेच्या चिन्हासह स्कार्फ घातलेले कार्यकर्ते संबंधित व्यक्तीला धमकावताना व मारहाण करताना दिसत होते. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित कार्यकर्त्यांना अटक केली होती, मात्र त्यांना काही तासांतच जामीन मिळाला.
या घटनांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "मराठी भाषा आणि माणसाचा आदर झाला पाहिजे, यावर कुणाचाही वाद नाही. मात्र त्यासाठी हिंसा आणि जबरदस्ती योग्य मार्ग नाही." त्यांनी हेही स्पष्ट केले की, राज्यात कोणत्याही जाती, भाषेच्या लोकांवर अन्याय होणार नाही. सरकार सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि कायद्याचे राज्य टिकवले जाईल.
मुंबईजवळील मीरारोड येथे एका मिठाई दुकानाच्या मालकाला मराठीत न बोलल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. काशिमीरा पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सदस्य असल्याचा संशय असलेल्या सात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बाबूलाल खीमजी चौधरी, वय ४८ वर्षे, हे मिठाई दुकान चालवतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मनसेच्या चिन्हांची ओळख पटणारे कपडे घातलेले सात जण दुकानात आले आणि त्यांनी पाणी मागितले. यानंतर त्यांनी बाबूलाल चौधरी यांना मराठीत बोलण्यास सांगितले. जेव्हा त्यांनी मराठीत बोलायला अडचण असल्याचे सांगितले, तेव्हा त्या व्यक्तींनी त्यांना धक्काबुक्की व मारहाण केली. काशिमीरा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.