'राजा शिवाजी'साठी मुख्यमंत्र्यांचा फोन; रितेश देशमुख झाला भावूक

Published : May 27, 2026, 07:40 PM IST
raja shivaji

सार

अभिनेता रितेश देशमुखने 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या निर्मितीवेळी आलेल्या एका मोठ्या अडचणीचा खुलासा केला आहे. सेटसाठी जागा मिळत नसताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशी मदत केली, हे त्याने एका पुरस्कार सोहळ्यात सांगितले. या मदतीमुळेच १२० कोटींहून अधिक कमाई करणारा हा चित्रपट वेळेत पूर्ण होऊ शकला.

अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला असतानाच आता चित्रपटाच्या निर्मितीमागचा एक खास किस्सा समोर आला आहे. एका पुरस्कार सोहळ्यात रितेशने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीबद्दल जाहीरपणे आभार मानले. चित्रपटाच्या सेटसाठी जागा मिळत नसताना फडणवीसांनी मोठी मदत केल्याचे त्याने सांगितले.

नेमकं काय झालं होत? 

रितेश देशमुखने सांगितले की, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका भव्य सेटसाठी योग्य जागेची गरज होती. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही जागा उपलब्ध होत नव्हती. अखेर एक सरकारी जागा योग्य वाटली, मात्र त्या जागेचे दर मराठी चित्रपटासाठी परवडणारे नव्हते. त्यामुळे त्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता.

रितेशच्या मते, फडणवीसांनी त्याची अडचण समजून घेत तातडीने मदतीचे आश्वासन दिले. “तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवत आहात, ती जागा उद्या सकाळपर्यंत उपलब्ध होईल,” असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे रितेशने सांगितले. या निर्णयामुळे चित्रपटाचे शूटिंग वेळेत पूर्ण होण्यास मदत झाल्याचेही त्याने नमूद केले. हा प्रसंग सांगताना रितेश भावूक झालेला पाहायला मिळाला. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्याचा गौरवही करण्यात आला. महाराष्ट्राची संस्कृती आणि इतिहास मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडल्याबद्दल त्याचा विशेष सन्मान करण्यात आला.

किती कमाई केली? 

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. जगभरात 120 कोटी रुपयांहून अधिक कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका स्वतः रितेश देशमुखने साकारली असून अनेक दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. गेल्या दहा वर्षांपासून रितेश या चित्रपटावर मेहनत घेत होता. दिग्दर्शनापासून अभिनयापर्यंत प्रत्येक गोष्टीत त्याने स्वतः लक्ष घातले. आता चित्रपटाच्या यशानंतर त्याच्या संघर्षाच्या कथा समोर येत असून, चाहत्यांकडूनही त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक