
Mumbai : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेली राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक काल राजकीयदृष्ट्या चांगलीच गाजली. पक्षातील अंतर्गत नाराजी, वरिष्ठ नेत्यांवरील टीका आणि आगामी राजकीय रणनीती यावरून बैठकीत वातावरण तापल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल यांच्यावर सातत्याने होणाऱ्या टीकेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे प्रफुल पटेल बैठकीला अनुपस्थित राहिल्याने पक्षातील नाराजीच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
बैठकीदरम्यान सुनील तटकरे यांनी पक्षातील काही घडामोडींवर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. स्वतःवर आणि प्रफुल पटेल यांच्यावर सातत्याने टीका होत असताना पक्षातील इतर नेते आपल्या समर्थनार्थ पुढे येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “प्रत्येक वेळी टीकेचे लक्ष्य आम्हीच का व्हायचे?” असा सवाल करत वरिष्ठ नेतृत्वाने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तटकरे आपली भूमिका मांडत असताना मंत्री Chhagan Bhujbal यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र गैरसमज दूर करण्यासाठी आपण बोलणारच असल्याचे तटकरेंनी स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.
बैठकीवेळी मुंबईत उपस्थित असूनही प्रफुल पटेल यांनी बैठकीला हजेरी लावली नाही. त्यामुळे पक्षातील त्यांच्या नाराजीच्या चर्चांना अधिक हवा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच या गैरहजेरीने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, सुनील तटकरेंच्या भाषणापूर्वीच Parth Pawar बैठकीतून बाहेर पडल्याची माहितीही समोर आली. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद अधिकच स्पष्ट झाल्याची चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा १० जून रोजी होणारा स्थापना मेळावा मुंबईत घ्यायचा की पुण्यात, यावरूनही बैठकीत मतमतांतरे झाल्याची माहिती आहे. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, पक्षात विविध मतप्रवाह दिसून आल्याचे सांगितले जात आहे.
बैठकीत बोलताना सुनेत्रा पवार यांनी पक्षाची बदनामी करणाऱ्यांना ठाम उत्तर देण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांना दिल्या. पक्ष फुटीच्या चर्चा आणि २२ आमदार शरद पवार गटात जाणार असल्याच्या अफवांमुळे पक्षाची प्रतिमा खराब होत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
तसंच, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदांबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही त्यांनी स्पष्टीकरण देत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे स्पष्ट केले. पक्ष कार्यकर्त्यांनी एकसंधतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे आणि आपल्यामध्ये कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले. बैठकीतील चर्चांचा चुकीचा अर्थ लावू नये आणि अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.