Weather Update : फेब्रुवारीत पावसाचा इशारा! राज्यात तापमानाची लपंडाव, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस

Published : Feb 03, 2026, 10:18 AM IST
Weather Update

सार

Weather Update : राज्यात फेब्रुवारी महिन्यातच पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, पुण्यासह अनेक भागात तापमानाची चढउतार सुरू आहे.

Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी चढउतार पाहायला मिळत असून, ऐन फेब्रुवारी महिन्यात पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कधी थंडी, कधी उकाडा तर कधी पावसाचे वातावरण अशी विचित्र स्थिती निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि आरोग्यावर होताना दिसत आहे.

उत्तर भारतात कडाक्याची थंडी, महाराष्ट्रात मात्र थंडी गायब

जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहारमध्ये सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे. साधारणपणे उत्तर भारतात थंडी वाढली की महाराष्ट्रातही थंडीची लाट येते. मात्र यंदा डिसेंबरनंतर राज्यातील थंडी हळूहळू कमी झाली असून, सध्या थंडी जवळपास गायब झाल्याचे चित्र आहे.

1 जानेवारीनंतर हवामानात सतत बदल

1 जानेवारी रोजी झालेल्या पावसानंतर राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. भारतीय हवामान विभागाने याआधीच फेब्रुवारी महिन्यात फारशी थंडी जाणवणार नसल्याचा अंदाज वर्तवला होता. त्याचवेळी काही शहरांमध्ये वाढते वायू प्रदूषणही गंभीर समस्या बनत चालली आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा

सध्याच्या परिस्थितीत राज्यात उकाडा वाढला असून, पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.आज छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, अहिल्यानगर, नंदूरबार, जळगाव, धुळे आणि नाशिक या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

पुण्यात हवामान स्थिर, मात्र उकाडा जाणवतोय

पुण्यात मागील काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहरात किमान तापमान सुमारे 14 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.

पुणेकर अनुभवतायत एका दिवसात तीन ऋतू

सकाळी आणि रात्री गारठा जाणवत असताना, दुपारी कडक ऊन आणि उकाडा जाणवतोय. सायंकाळी ढगाळ वातावरण असल्याने पुणेकरांना एका दिवसात थंडी, उन्हाळा आणि पावसाची चाहूल—असा तीनही ऋतूंचा अनुभव येत आहे.

हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम

हवामानातील सतत बदलामुळे सर्दी, ताप, खोकला आणि अंगदुखी यांसारख्या आरोग्य समस्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ऐन फेब्रुवारी महिन्यात पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Farmer Loan Waiver : गरीब शेतकऱ्यांना कर्जातून मुक्ती; बावनकुळे यांचा सरकारकडून ठाम शब्द
अपघाताने आयुष्य बदलले… नदीने दिले नवे बळ, पुण्याच्या रस्त्यांवर गाण्यातून नद्यांचे रक्षण करणारा ‘वन मॅन बँड’ स्वप्निल ठाकूर