
Farmer Loan Waiver : राज्यातील गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारकडून केली जाणार असून, दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. फार्महाऊसधारक किंवा धनदांडग्या शेतकऱ्यांचा विचार न करता, वर्षानुवर्षे शेतीत राबणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्जावरील व्याज आणि व्याजावर व्याज वाढल्याने अनेक शेतकरी हताश होतात आणि आत्महत्येचा विचार करतात. मात्र अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले. गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणारच असल्याचे त्यांनी पुनरुच्चारले.
धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे आयोजित सभेत बोलताना बावनकुळे यांनी हे विधान केले. पुढील काळात शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागू नये, यासाठीही सरकार उपाययोजना करत असल्याचे त्यांनी नमूद केले. दीर्घकाळ शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील, असेही ते म्हणाले.
गरीब शेतकरी ३० ते ४० वर्षे शेतात राबतात, कर्जबाजारी होतात आणि आत्महत्येचा विचार करतात. मात्र अशा शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार नाही, असा ठाम निर्धार सरकारचा असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारकडून लवकरच कर्जमाफीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, कर्जमाफी फक्त गरीब शेतकऱ्यांनाच मिळणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे ‘गरीब शेतकरी’ याची नेमकी व्याख्या काय असणार, कोणते शेतकरी पात्र ठरणार आणि कोण वगळले जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये ‘लाडकी बहीण योजना’ बंद करण्यात आली असल्याचा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजपशासित राज्यांमध्ये ही योजना सुरू असून, महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
याच सभेत बोलताना बावनकुळे यांनी केंद्र सरकारच्या ‘एक कोटी लखपती दीदी’ योजनेचा उल्लेख केला. या योजनेअंतर्गत महिलांना विनातारण, विनाहमी पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.