
Accident News : विरार पश्चिमेच्या अर्नाळा परिसरात रविवारी सकाळी ९ वाजता एसटी आणि रिक्षाची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षाचालक महिलेसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत महिलेचे नाव कल्पना कोलगे (५५) असून त्या अर्नाळा जुना कोळीवाडा येथील रहिवासी आहेत.
या अपघाताची घटना अर्नाळा सोसायटीजवळील मुख्य रस्त्यावर घडली. एमएच ४० एन ९७०६ क्रमांकाची एसटी बस शिर्डीकडे निघाली होती, तर एमएच ४८ बीएफ ६८६१ क्रमांकाची रिक्षा विरारहून अर्नाळाकडे येत होती. ओव्हरटेक करताना एसटीने रिक्षाला धडक दिली.
या धडकेत रिक्षाचालक पूनम वरठे आणि इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तिघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, धडकेत कल्पना कोलगे यांचं डोकं जोरात आपटल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अपघातानंतर एसटी बसचा चालक फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
नुकत्याच लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गाच्या टप्प्यावर शहापूर येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. कोळकेवाडी आणि आमने टोलनाका दरम्यान शहापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाशिंद पोलीस हद्दीत आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन वाहनांमध्ये जोरदार धडक होऊन दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. या अपघातात क्रुझर जीप आणि ट्रकचा समावेश असून वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.