
सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका वडिलांनी, ते स्वतः शाळेचे मुख्याध्यापक आहेत, त्यांनी आपल्या १८ वर्षीय मुलीला बारावीच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ही मुलगी नुकतीच बारावीची चाचणी परीक्षा दिली होती, त्यामध्ये मुलीला कमी मार्क्स मिळाले. मुलीला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तिचे वडील संतापले. घरात दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात वडिलांनी तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे तिची तब्येत बिघडली आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणात वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. आईने हा गुन्हा तिच्या वडिलांच्या विरोधात दाखल केला होता. ही घटना केवळ एक गुन्हा नाही, तर ती शैक्षणिक दबाव, अपेक्षा आणि पालक-विद्यार्थी नात्याच्या मर्यादांवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करते. विद्यार्थ्यांवर अभ्यासाच्या नावाखाली होणारा मानसिक ताण आणि अपेक्षांचा भार यावर समाजाने आणि पालकांनी आता गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.
अशा प्रकारच्या घटना आपल्याला दुर्दैवाने वारंवार पाहायला मिळत आहेत, अभ्यासात कमी गुण मिळाल्यामुळे किंवा अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे पालक आपल्या मुलांवर राग काढत असतात. काही वेळा हा राग इतका टोकाचा असतो की, त्यामुळे मुलांच्या जीवावर बेतते. शैक्षणिक दबाव, परीक्षेतील अपयश, आणि पालकांच्या अपेक्षा यामुळे विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य ढासळतं आणि घरातील वातावरणही तणावपूर्ण बनतं असतं.
2018 मध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील एका 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केली होती. ती दहावीच्या निकालामुळे खूप तणावात होती. तिने अपेक्षेप्रमाणे गुण मिळवले नव्हते आणि घरच्यांची भीती वाटत असल्यामुळे तिने टोकाचा निर्णय घेतला. अशा घटनांमुळे हे लक्षात येतं की केवळ अभ्यास हा आयुष्याचा शेवट नाही, आणि पालकांनी मुलांशी मोकळेपणाने बोलणं गरजेचं होतं.
2020 मध्ये नाशिकमध्ये एक मुलगा बारावीच्या निकालानंतर नैराश्यात गेला होता. त्यानेदेखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शाळा, शिक्षक आणि पालक यांनी जर वेळीच संवाद साधला असता, त्याला समजावलं असतं तर ही घटना टाळता आली असती. मुलांच्या भावनांना समजून घेणं आणि त्यांच्या चुका समजावून सांगणं, त्यांना आधार देणं हे अधिक महत्त्वाचं आहे.
या सर्व घटनांवरून हे स्पष्ट होते की पालकांच्या अपेक्षा आणि सामाजिक स्पर्धा यामुळे मुलांवर मानसिक दडपण येते. शिक्षण हे महत्त्वाचं असलं तरी तेच सगळं काही नाही. प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते. त्यामुळे पालक, शिक्षक आणि समाजाने मुलांवर विश्वास ठेवून त्यांना समजून घेतल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात. शिक्षणासोबतच प्रेम, संवाद आणि समजूत यांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे.