
गोंदिया : महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात आमगाव-देवरी महामार्गावर अंजोरा गावाजवळ काही तरुण वाघाचा पाठलाग करताना आणि त्याला दगड मारताना दिसत असलेला एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. २० जून रोजी घडलेल्या या घटनेमुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत असून, वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत आणि वनविभागाच्या प्रतिसादावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
व्हिडिओमध्ये, तरुण अनेकदा वाघाचा पाठलाग करताना आणि त्याला दगड मारताना दिसत आहेत. वाघाने त्यांना प्रत्युत्तर म्हणून पाठलाग करायला सुरुवात केल्यावर तरुणांनी घाबरून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार एका स्थानिक रहिवाशाने आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केला असून, तो मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, वनविभाग संबंधित व्यक्तींवर कारवाई करणार का?, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. या घटनेमुळे वन्यजीवांप्रती अशा बेफिकीर वर्तनाला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे. अनेकजण यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत, तसेच वनविभागाने अशा प्रकारच्या बेकायदेशीर वन्यजीव छळाला आळा घालण्यासाठी कठोर नियम लागू करावेत अशी विनंती करत आहेत.