
नाशिक : नुकत्याच उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर बुधवारी सकाळी एक भीषण अपघात घडला, ज्यात नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला. मुंबईहून नाशिककडे येत असताना, त्यांच्या मर्सिडीज कारचा शहापूर हद्दीत अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नी आणि दोन मुलं गंभीर जखमी झाले असून, एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे.
हेकरे कुटुंब मुंबईहून नाशिककडे येत असताना, इगतपुरी जवळील बोगद्याजवळ शहापूर परिसरात हा अपघात घडला. अत्यधिक वेगात असलेली मर्सिडीज कार दुभाजक तोडून पलटली, आणि त्यात सुनील हेकरे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी व दोन मुलं यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आहमे अवघ्या तीन आठवड्यांपूर्वीच उद्घाटीत झाला होता. परंतु या टप्प्यावर खड्डे पडल्याची माहिती समोर आल्यानंतर आता महामार्गाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतो आहे. मिडियाने खड्ड्यांच्या बातम्या समोर आणल्यानंतर यंत्रणांची धावपळ झाली होती, मात्र हे अपघात रोखण्यासाठी पुरेशी उपाययोजना झाली का, असा सवाल निर्माण होतो आहे.
उद्योजक सुनील हेकरे हे नाशिक शहरात बिझनेस आणि सामाजिक क्षेत्रात परिचित नाव होतं. त्यांच्या अचानक निधनामुळे औद्योगिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. या अपघाताने समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेबाबतची चिंता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.