
पुणे : देशात आणीबाणी लावल्याच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाकडून काँग्रेसवर टीकास्त्र सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. एका कामगार संघटनेच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटनांकडे लक्ष वेधलं आणि म्हटलं की, “घोषित आणि अघोषित आणीबाणी यामध्ये काय फरक आहे, हे समजून घेण्याची हीच वेळ आहे. पुन्हा एकदा सावध राहण्याचा काळ आलाय.”
पवार म्हणाले की, “आजही जर एखादं वृत्तपत्र सरकारविरोधी ठाम मत मांडत असेल, तर त्या कार्यालयात थेट सरकारकडून फोन जातात. सांगितलं जातं की बातमी छापू नका. छापलीच, तर परिणामांना तयार राहा. ही परिस्थितीही एका प्रकारची अघोषित आणीबाणीच आहे.”
“देशाची संसदीय लोकशाही टिकून राहण्यासाठी आम्ही काहीही किंमत मोजायला तयार आहोत,” असं स्पष्ट करत त्यांनी सत्तेच्या गैरवापराचा इशाराही दिला. पुढे बोलताना त्यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीचा उल्लेख केला आणि म्हटलं, “हो, आणीबाणी लावली गेली, लोकशाहीवर मर्यादा आल्या. पण पराभवानंतर इंदिरा गांधींनी देशाची माफी मागितली. ही गोष्ट विसरता कामा नये. त्यानंतर जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली. त्यावेळी लोकशाहीचा विजय झाला.”
शरद पवारांच्या या वक्तव्यातून एक गोष्ट स्पष्ट होते. सध्या देशात उभ्या असलेल्या राजकीय परिस्थितीबद्दल त्यांच्या मनात गंभीर चिंता आहे. सत्तेचा वापर केवळ विरोधाचा आवाज दाबण्यासाठी केला जातोय, हे सूचित करत त्यांनी नागरिकांना आणि माध्यमांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.