
Todays Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावताच हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या तीव्रतेनुसार ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
मुंबई उपनगरांत रात्रभर मुसळधार पाऊस
मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि वसई-विरारमध्ये रात्री उशिरा जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे कामावरून परतणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. रस्त्यावर चिखल, पाणी तुंबलेली सखल ठिकाणं आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले. काही भागांत घरात पाणी शिरल्याने रात्र जागून काढावी लागली.
पिंपरी, डुडुळगाव परिसरातही पावसाचा फटका
नाशिक फाटा, डुडुळगाव आणि परिसरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. पिंपरी शहरात वातावरण ढगाळ असून हलक्या सरी सुरू आहेत.
रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट
हापूसवर परिणाम रत्नागिरी जिल्ह्यात आज पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून, पुढील दोन दिवसांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याचा हापूस आंब्याच्या शेवटच्या टप्प्यातील उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
घाटमाथ्यावरही पावसाचा जोर
नाशिक, पुणे, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यांसह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यभरात विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा
धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ अशा २५+ जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या नागरिकांना सूचना:
पुढील काही दिवस हवामान अतिशय अस्थिर राहण्याची शक्यता असून नागरिकांनी अधिकृत सूत्रांद्वारे मिळणाऱ्या इशाऱ्यांकडे लक्ष ठेवून सुरक्षितता बाळगावी, असं हवामान विभागाने आवाहन केलं आहे.