
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील गावांना महापूर आला असून येथे एक दुर्घटना घडली. घाटंजी तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळं दोघे जण पुरात वाहून गेले आहेत. रविवारी दुपार पासून पावसाचा जोर कायम राहिल्यामुळं वाघाडी नदीला पूर आला होता.
यावेळी कोपरी-येरंडगाव रस्त्यावरील चिंचोली गावाच्या पुलावरून पाणी वाहत होतं. यामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह येथील गावकऱ्यांना दिसून आला. संजय तुरक पाटील यांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं तो पुढील गावात वाहून गेला. तरोडा गावाच्या दिशेने हा मृतदेह वाहून जाताना दिसला होता.
शिरोली येथे एक मजूर वाहून गेला असून संभाजी भुऱ्या आत्राम असं त्याच नाव आहे. आत्राम हे त्यांच्या पत्नीसोबत शेतामध्ये काम करायला गेले होते. यावेळी पत्नी लवकर शेतातून घरी आल्या पण त्यांचे पती संभाजी हे घरी न आल्यामुळे त्यांची चिंता वाढत गेली. नंतर त्यांचे पती पाण्यात वाहून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. अखेर त्यांचा मृतदेह नाल्याच्या पाण्यात झाडाला अडकलेला दिसून आला.