
Thane : ठाण्यातील एका आमदाराला व्हॉट्सॲपवरून अज्ञात महिलेने वारंवार कॉल आणि मेसेज करून अश्लील फोटो व व्हिडीओ पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. याच माध्यमातून त्या महिलेने आमदाराकडे पाच ते दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आमदाराने दिलेल्या तक्रारीनंतर चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिला फरार आहे.
गेल्या वर्षी आमदार कोल्हापूर दौऱ्यावर असताना, एका अज्ञात महिलेचे त्यांना सातत्याने फोन येत होते. सुरुवातीला काही गैरप्रकार होऊ नये म्हणून आमदाराने तिचा नंबर ब्लॉक केला. काही महिन्यांनंतर पुन्हा तीच महिला व्हॉट्सॲपवरून संपर्क साधू लागली आणि अश्लील फोटो व व्हिडीओ पाठवू लागली.
अलीकडेच त्या महिलेने पुन्हा आमदाराला संपर्क साधत, त्यांची प्रतिमा मलीन करण्याची धमकी देत पाच ते दहा लाख रुपयांची मागणी केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या आमदाराने लगेचच पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
चितळसर पोलिस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपी महिलेचा शोध सुरू असून, सायबर गुन्हा शाखाही तपासात सक्रिय झाली आहे. प्राथमिक तपासात ही महिला कोणत्यातरी रॅकेटचा भाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, अज्ञात व्यक्तींनी पाठवलेले फोटो, व्हिडीओ किंवा कॉल यांना प्रतिसाद देऊ नये. संशयास्पद संपर्क आल्यास लगेचच जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर सेलमध्ये तक्रार करावी.