
पिंपरी (पुणे): दिवाळीच्या आनंदात गावी जाण्याच्या तयारीला नागरिक लागले असताना खासगी ट्रॅव्हल्सने तिकीट दरांमध्ये प्रचंड वाढ करत प्रवाशांना धक्का दिला आहे. रेल्वे आणि एसटीची तिकिटे पूर्णपणे भरल्यामुळे पर्याय म्हणून खासगी बस सेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर आता तिप्पट भाड्याचा बोजा येत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी-चिंचवड येथून नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला अशा विदर्भातील शहरांमध्ये जाणाऱ्या बस तिकीटांचे दर 1700-2000 रुपयांवरून थेट 3500 ते 4000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ही वाढ केवळ दुप्पट नव्हे, तर अनेक मार्गांवर तिप्पट झाली आहे.
खासगी बस ऑपरेटर्सना नियमांनुसार एसटीच्या तिकीट दराच्या दीडपटापर्यंत भाडे आकारता येते. मात्र, या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करत त्याहून अधिक दर लावले जात आहेत. एसटी महामंडळाने काही अतिरिक्त बसेस सोडल्या असल्या तरी त्या देखील तातडीने फुल्ल झाल्या आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील हजारो विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याची तयारी करतात. परंतु सध्या खासगी ट्रॅव्हल्सच्या वाढत्या दरांमुळे प्रवास करावा की नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला आहे.
खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी दरवाढीविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. ही वाढती महागाई सर्वसामान्यांसाठी आर्थिक झळ ठरते आहे. यामुळे सरकार किंवा परिवहन विभागाने यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
शक्य असल्यास प्रवासाचे आधीच बुकिंग करावे.
अधिकृत वेबसाइट्स किंवा अॅप्सवरून तिकीट दरांची तपासणी करावी.
तक्रारींसाठी परिवहन विभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
खासगी ट्रॅव्हल्सने तिकीट दर वाढवून दिवाळीचा आनंद हिरावण्याचा प्रकार थांबवणे गरजेचे आहे. सर्व प्रवाशांनी जागरूक राहून, योग्य माहिती घेऊनच प्रवास करावा.