
पुणे | प्रतिनिधी पुण्यातील अल्पवयीन मुलीवर घडलेली अत्याचाराची घटना समोर येताच संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा मुलीच्या कुटुंबाशी परिचित असलेला, घरात काम करणारा स्वयंपाकी आहे. आरोपीने या मुलीवर धरण परिसरात नेऊन अत्याचार केल्याची खळबळजनक माहिती समोर आली असून, पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणाचा उलगडा धरणाजवळ एक चप्पल आणि ओढणी सापडल्यानंतर झाला. त्या आधारावर शोध घेतल्यावर मुलगी गंभीर अवस्थेत आढळली. तिच्यावर त्वरित वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले असून, ती अजूनही मानसिकदृष्ट्या हादरलेली आहे.
पोलिस तपासातून स्पष्ट झाले की, मुलगी आणि आरोपी एकमेकांना आधीपासून ओळखत होते. आरोपी स्वयंपाकी म्हणून काम करत होता आणि कुटुंबाचा विश्वास संपादन करून त्याने अत्याचारासारखे अमानवी कृत्य केलं.
पोलिसांनी POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. फॉरेन्सिक तपास, मेडिकल अहवाल आणि सीसीटीव्ही फूटेजवर आधारित तपास जलद गतीने सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.
घटनेनंतर परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना आणि स्थानिक नागरिकांनी न्यायासाठी जोरदार मागणी केली आहे. "अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला चाप लावण्यासाठी कडक शासन आणि जलद न्याय मिळालाच पाहिजे," अशी जनभावना आहे.